– जैविक हवाई इंधनासाठी भारताकडून मोठी अपेक्षा – केंद्रीय मंत्री हरदिप सिंह पुरी
पुणे :- मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणाऱ्या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी यांच्या हस्ते आज झाले . या प्रकल्पातून शाश्वत जैविक हवाई इंधन अर्थात एस ए एफ ची निर्मिती होणार आहे.
पुण्याजवळील पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील प्राज उद्योग समूहाच्या संशोधन आणि विकास विभागात हा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला प्राज चे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्यासह इंडियन ऑइल आणि अन्य तेल कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते . त्यांच्याशी संवाद साधताना पुरी यांनी या जैविक हवाई इंधनाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यासाठी आवश्यक तो कच्चा शेतमाल उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले . जैविक हवाई इंधनासाठी जगभरातील बहुतेक देशांची भारताकडून मोठी अपेक्षा असल्याचे दावोस इथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक व्यापार परिषदेत दिसून आल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.
ब्राझीलच्या आधी भारतात या जैविक हवाई इंधनाचा प्रकल्प उभा राहिल्याबद्दल त्यांनी प्राज उद्योग समूहातील तंत्रज्ञांचे जाहीर अभिनंदन केले आणि हा प्रकल्प खऱ्या अर्थाने जगासाठी पथदर्शी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
उद्घाटनानंतर पुरी यांनी अन्य अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पाची पाहणी केली आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल समाधान व्यक्त केले .
मद्यार्क पासून बनवलेल्या हवाई इंधनाचा वापर करून गेल्या वर्षी पुणे ते दिल्ली हा विमान प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला होता .त्यावेळी दिल्ली विमानतळावर या विमानाचे स्वागत पुरी यांनीच केले होते .