– विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण
नागपूर :- नागपूर शहरातील शंभर टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका, नासुप्र आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयताळा मार्गावरील नरकेसरी ले-आऊट येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार नाना श्यामकुळे, नासुप्रचे विश्वस्त संदीप इटकेलवार, दक्षिण-पश्चिम भाजपचे अध्यक्ष किशोर वानखेडे, प्रकाश भोयर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘शहरात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे करण्यात आली. आजही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.
मेट्रो, मिहान, एम्स, सिम्बॉयसिस, मेयो-मेडिकलचा विकास आदींचा यात समावेश आहे. ही सगळी कामे आम्ही करू शकलो याचे श्रेय जनतेला आहे. कारण जनतेने निवडून दिले नसते तर विकासकामे करता आली नसती.’ जनतेने जात-पात-धर्म न बघता आमच्यावर प्रेम केले आणि निवडून दिले, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पूर्वी नागपुरात पाण्याची टंचाई राहायची. आम्ही स्वतः पूर्वीच्या काळात पाण्यासाठी मडके फोडून आंदोलने केली आहेत. पण आता शहरात पाण्यासाठी मोर्चे काढण्याची गरज पडत नाही. लवकरच संपूर्ण नागपूरला चोवीस तास पाण्याची सुविधा मिळेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले. जयताळ्याचा दीड लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ लोकांच्या सेवेत आल्यामुळे अनेक वस्त्यांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात आठ हजार कोटी रुपये दिले. यात मेयो-मेडिकल, मेट्रो, शक्तीपीठ मार्ग, मिहान, लॉजिस्टिक हब, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, एलआयटी आदींचा समावेश आहे. रोजगाराच्या निर्मितीसाठी लॉजिस्टिक हबची योजना. समृद्धी महामार्गामुळे नागपूर हे देशातील सर्वांत मोठे लॉजिस्टिक कॅपिटल होणार आहे.’
विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने वर्धा रोड हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा बाजार चौक पर्यंत साडेपाच किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण तसेच केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत जयताळा येथे तयार करण्यात आलेल्या १.५ लक्ष लीटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण आणि केंद्र शासनाच्या १५व्या वित्त आयोगांतर्गत जयताळा येथे प्रस्तावित पर्यावरणपूरक दहनघाटाच्या कार्याचे भूमिपूजन झाले. तर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अख्त्यारितील विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण यावेळी झाले. दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सिमेंट रस्ते, पर्जन्य वाहिनी, मलवाहिका, इंटलॉकिंग ब्लॉक, जयताळा येथील विविध रस्त्यांचे डांबरीकरण या कामांचे भूमीपूजन झाले. तर अॉनलाईन गुंठेवारी, अॉनलाईन भाग नकाशा, सात दिवसांत लिज पट्टा नुतनीकरण या कामांचे भूमीपजून ना. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.