जिल्हयातील तीनही प्रकल्प जागतिक दर्जाचे करा केंद्रीय मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा

आढावा घेतलेले प्रकल्प

• कृषी कन्व्हेंशन सेंटर आणि लॉजिस्टिक पार्क

• अजनी इंटरमॉडेल स्टेशन आणि बस पोर्ट

• अंभोरा तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प

नागपूर :-  कृषी कन्व्हेंशन सेंटर आणि लॉजिस्टिक पार्क, अजनी इंटरमॉडेल स्टेशन व बस पोर्ट निर्मिती आणि अंभोरा तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पास गती देण्याचे आणि हे सर्व प्रकल्प जागतिक दर्जाचे बनविण्याचे निर्देश आज केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत दिले.

येथील रविभवनाच्या सभागृहात आज या सर्व प्रकल्पांची मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सल्लागार बी.डी.थेंग, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे , नागपूर मध्यवर्ती कारागृह, पाटबंधारे विभाग, भारतीय अन्न महामंडळ आदींचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नागपूर येथे दाभा परिसरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी कन्व्हेंशन सेंटर उभारताना नवी दिल्ली येथील प्रगती मैदान कॉम्पलेक्समधील प्रशस्त दालनाप्रमाणे मोठे हॉल निर्माण करण्यात यावे, उत्तम पार्किंग आणि इंटेरियर व्यवस्था, सौर ऊर्जेचा उपयोग व्हावा अशा सूचना गडकरी आणि फडणवीस यांनी दिल्या. या प्रकल्पांतर्गत प्रयोगशाळा, संरक्षक भिंती, ॲम्पी थिएटर, लँडस्केपिंग, सोलर पॅनल, आंतरिक रस्ते, पाणी , मलनि:सारण आदीं प्रारंभिक कामास गती देण्याचे निर्देशही देण्यात आले. कन्व्हेंशन सेंटरसाठी जागा अधिक वाढवून देण्याच्या उभय नेत्यांनी सूचना केली.

नागपुरात उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्क संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. हे पार्क भव्य व एकत्र असावे. समृद्धी महामार्गाचाही उपयोग व्हावा. याठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा असाव्यात जेणे करून मध्यवर्ती नागपूर शहराचे महत्व वाढावे तसेच मोठया कंपन्यांना त्याची मदत व्हावी, यासाठी योग्य जागेची निवड करावी आणि तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उभय नेत्यांनी केली.

अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशन उभारण्यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागपूर मध्यवर्ती कारागृह, रेल्वे, पाटबंधारे विभाग, भारतीय अन्न महामंडळ आणि वैद्यकीय महाविद्यालयाची जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात येणार आहे. इंटरमॉटेल स्टेशनद्वारे वाहतूक आणि व्यावसायिक झोन उभारण्यात येणार असून प्रवासी व व्यावसायिकांसाठी येथे यात्री कॉम्पलेक्स, मॉल, पंचतारांकीत हॉटेल अशा उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच येथे बस पोर्टही उभारण्यात येणार आहे. कटरा ,वैष्णोदेवी येथे उभारण्यात येणाऱ्या बहुआयामी इंटरमॉडेल प्रकल्पाप्रमाणे हा प्रकल्प साकारावा, रेल्वे स्थानकाखालून जाण्या येण्याची व्यवस्था व्हावी अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

कुही तालुक्यातील अंभोरा तिर्थक्षेत्र विकास प्रकल्पाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. या तिर्थक्षेत्राची भौगोलिक स्थिती पाहता या प्रकल्पास साहसी व जल पर्यटनाची जोड देण्याची सूचना करण्यात आली. या प्रकल्पाबाबत सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून पर्यटन विभागाकडे पाठवण्याच्या सूचनाही यावेळी फडणवीस यांनी केल्या. नागपूर व भंडारा जिल्हयांच्या सिमेवरील हा प्रकल्प असून दोन्ही जिल्हयाच्या एकत्रित प्रस्ताव पर्यटन विभागाला पाठविण्यात यावा ,अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पारडी येथे पोलीस स्टेशनचे भूमिपूजन

Sat May 13 , 2023
नागपूर :- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या पारडी येथील पोलीस स्टेशनचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.12) आभासी पद्धतीने भूमिपूजन झाले. याप्रसंगी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार सर्वश्री विकास कुंभारे, मोहन मते, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com