मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे, येथील “काश्मीर ते कन्याकुमारी” या संकल्पनेवर आधारित स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिकृतीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार आशीष शेलार यांनी मंडळाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री शाह यांना स्वामी विवेकानंद यांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मंडळाचे सल्लागार तथा आमदार आशीष शेलार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत, प्रतिमा शेलार, रचना राऊत यांच्यासह अन्य मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेतले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वांद्रे पश्चिम येथे साकारलेल्या 28 व्या गणेशोत्सवात यावर्षी स्वामी विवेकानंद स्मारक मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या गणेशोत्सवात तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथील वनथुराई समुद्रकिनारी असलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाच्या प्रतिकृतीतून ‘काश्मीर ते कन्याकुमारी एक भारत ‘असा सांस्कृतिक संदेश दिला जात आहे.