– दाणापूर-सिकंदराबाद एक्सप्रेसमधील घटना
– पेंट्रीकार कर्मचार्यासह पाण्याच्या बाटल्या जप्त
नागपूर :-अधिकृत पेंट्री कारमध्ये अनाधिकृत पाण्याची विक्री केल्याची घटना शनिवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर दाणापूर-सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये उघडकीस आली. जागरुक प्रवाशाच्या तक्रारीवरून आरपीएफच्या पथकाने पेंट्रीकार कर्मचार्यासह पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या. रवी रंजन असे पेंट्रीकार व्यवस्थापकाचे नाव आहे. अनाधिकृत पाण्याच्या विक्रीवरून काही वेळ वाद निर्माण झाला होता.
गिरीधर गोपाल असे प्रवाशाचे नाव आहे. ते बी-3 कोच मध्ाून (बर्थ-47) प्रयागराज ते सिकंदराबाद असा प्रवास करीत होते. भारतीय रेल्वेत रेल नीर याच कंपनीचे पाणी विक्रीसाठी अधिकृत करण्यात आले आहे. मात्र, दाणापूर एक्सप्रेसच्या पेंट्रीकारमध्ये मान्यता नसलेल्या पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवले होते. प्रवासी गिरीधर गोपाल यांनी अनाधिकृत पाण्याच्या विक्रीवर आक्षेप घेतला तसेच हे पाणी तुम्ही विक्री करू शकत नाही. यावरून त्यांच्यात वाद झाला. गोपाल यांनी या प्रकरणाची तक्रार रेल्वे कंट्रोल आणि हेल्प लाईनवर केली.
नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर 11.10 वाजता गाडी येताच आरपीएफचे ब्रीज मोहनसिंग, नीरजकुमार तसेच आणि लोहमार्ग पोलिस अहिरवार, विजय मरापे यांनी घटनास्थळ गाठले. गोपाल यांची भेट घेतली. पाण्याचे प्रकरण असल्याचे आरपीएफने पेंट्रीकार व्यवस्थापक रवी रंजन यांच्यासह पाण्याच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. रेल्वे नियमानुसार कायदेशिर कारवाई केली. तत्पूर्वी अनाधिकृत पाण्यावरून गोपल आणि पेंट्रीकार व्यवस्थापक यांच्या वाद झाला. हे पाणी विक्रीसाठी नव्हे तर पेंट्रीकारमधील कर्मचार्यांना पिण्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण रवी रंजन यांनी दिले. ही कारवाई आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीना यांच्या नेतृत्वात करण्यात आली.