Ø जिल्ह्यात 25 हजारावर समुहांची स्थापना
Ø यावर्षी समुहांना 260 कोटींचे बॅंक लिंकेज
Ø समुहातील 53 हजार महिला ‘लखपती दिदी’
यवतमाळ :- महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद जिल्ह्यातील महिलांसाठी आर्थिक समृद्धीचा मार्ग ठरले आहे. अभियानातून जिल्ह्यात 25 हजारावर स्वयं सहायता समूहांची स्थापना झाली असून या समुहातील 2 लाख 65 हजार कुटुंबात आर्थिक समृद्धी आली आहे. सुरुवातीस छोट्या व्यवसायात रमणाऱ्या समुहांच्या महिला आता उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करतांना दिसत आहे.
ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या सक्षम व स्वायत्त संस्था उभारून त्यांना वित्तीय सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी उमेद अभियान चालविले जात आहे. सामाजिक, आर्थिक, वित्तीय समावेशन व सार्वजनिक सेवांची उपलब्धी व विकास योजनांचा लाभ हे या अभियानाचे आधारस्तंभ आहे. हाच आधार पुढे नेत जिल्ह्यात अभियानाची वाटचाल सुरु आहे. आतापर्यंत अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल 25 हजार 673 समुहांची स्थापना झाली आहे. या समुहांमधील 2 लाख 47 हजार कुटुंबे आर्थिकदृष्ट्या समृध्दीकडे वाटचाल करीत आहे.
अभियानाचे गावपातळीवर उत्तमप्रकारे कामकाज होण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 403 ग्रामसंघ तर 63 प्रभागसंघ स्थापन करण्यात आले आहे. केवळ महिला शेतकऱ्यांद्वारे संचालित तब्बल 24 उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या आहे. ईतक्या कंपन्या स्थापन करणारा यवतमाळ जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. ईतर उत्पादक संघ 988 इतके आहेत. या उत्पादक संघांना 2 कोटी 4 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
उमेदअंतर्गत जिल्ह्यात 6 उद्योग विकास केंद्र तर 97 वन धन विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. स्वयं सहाय्यता समुहांना आर्थिक सहाय्यासाठी बॅंकांशी जोडण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात 8 हजार 196 समुहांना तब्बल 260 कोटींचे लिंकेज देण्यात आले आहे. 21 हजार 777 समुहांना 35 कोटी 83 लाख रुपयांचे खेळते भांडवल तर 14 हजार 157 समुहांना 84 कोटी 94 लाखाचा समुदाय गुंतवणुक निधी वितरीत करण्यात आला आहे.
उमेद अभियानांतर्गत सहभागी महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी लखपती दिदी कार्यक्रमांतर्गत त्यांचे उत्पन्न 1 लाख इतके करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत विविध समुहातील 53 हजार 60 महिलांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक झाले आहे. उर्वरीत 1 लाख 5 हजार समुहातील महिलांचे उत्पन्न विविध उद्योजकीय योजनांचा लाभ देऊन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.