स्वच्छ भारत दिवसानिमित्त बाईक रॅली रविवारी

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत दिवसाच्या औचित्याने रविवारी २ ऑक्टोबर रोजी बाईक रॅली काढण्यात येणार आहे. स्वच्छ आणि सुंदर नागपूरसाठी प्रत्येकाने स्वच्छतेप्रति जागरूक होण्याचा संदेश देत ही रॅली नागपूर शहरातून निघेल. स्वच्छता रॅलीमध्ये शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

रविवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता नागपूर महानगरपालिका मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथून रॅलीला सुरुवात होईल. पुढे विधान भवन चौक – मिठानीम दर्गा – गुप्ता हाऊस – हिस्लॉप कॉलेज – आरबीआय कॉलनी चौक – भोले पेट्रोल पंप चौक – ट्राफिक पार्क – वानखेडे सभागृह – अलंकार चौक – काछीपुरा चौक – लोकमत चौक – धंतोली उद्यान – मेहाडिया चौक – मुंजे चौक – आनंद टॉकीज – रेल्वे अंडर ब्रिज – कॉटन मार्केट – टिळक पुतळा – गांधीगेट – चिटणीस पार्क चौक – बडकस चौक या मार्गाने टाऊन हॉल महाल येथे रॅलीचे समापन होईल.

रॅलीच्या समापनानंतर सकाळी १० वाजता टाऊन हॉल येथे स्वच्छ भारत अभियान नागपूरचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय गणेशोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण, गणेशोत्सवात सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार आणि स्वच्छता विषयी जागृती करणाऱ्या फ्लॅशमॉबचे आयोजन करण्यात आले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com