मुंबई :-मविआ आघाडी सत्तेत असताना राज्य सरकारची नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांना पाठिंबा देणारे शरद पवार यांनी राज्यातल्या तरुणांची दिशाभूल केली असून याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी , या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , संजय केनेकर, माधवी नाईक , खा . प्रताप पाटील चिखलीकर , खा . धनंजय महाडिक , आ. प्रवीण पोटे पाटील, आ. प्रवीण दरेकर, आ.निरंजन डावखरे, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी , पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी नोकर भरतीचा पहिला निर्णय काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या काळात २००३ मध्ये घेण्यात आला असल्याचे पुरावे दिले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ आघाडी सरकारच्या काळात कंत्राटी नोकर भरतीचा शासकीय निर्णय ( जीआर ) कसा झाला याची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कागदपत्रे सादर करून दिली होती. कंत्राटी भरतीचे पाप १०० टक्के उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच आहे. आता त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, त्यांनी ती न मागितल्यास आम्ही त्यांना जनतेत उघडे पाडू, असा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे शनिवारी राज्यभर उद्धव ठाकरे , शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. नागपूर येथील आंदोलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सहभागी झाले होते. मुंबईत गिरगाव येथे झालेल्या आंदोलनात विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर , मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, शरद चिंतनकर, माजी आमदार अतुल शहा , पुणे येथील आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , शहराध्यक्ष धीरज घाटे , ठाणे येथील आंदोलनात आ. निरंजन डावखरे , शहराध्यक्ष संजय वाघुले, नांदेड येथील आंदोलनात खा . प्रताप पाटील चिखलीकर , कोल्हापूर येथील आंदोलनात खा . धनंजय महाडिक , महेश जाधव , छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलनात प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आदी सहभागी झाले होते.