घाबरू नका, सतर्क रहा, लक्षणे आढळताच चाचणी करा : मनपा आयुक्तांचे आवाहन
नागपूर : नागपुरात ओमिक्रॉन बी ए ५ या व्हेरियंटच्या दोन रुग्णांची नोंद झालेली आहे. कोरोनाबाधित दोन रुग्णांना ओमिक्रोन बी ए ५ व्हेरियंटची लक्षणे आढळलेली आहेत. यामध्ये ४५ वर्षीय महिला आणि आणि २७ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असून दोघेही घरीच उपचार घेत आहेत.
नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाची थोडीही लक्षणे आढळताच त्वरीत चाचणी करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी केले आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात ४४ कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय मोबाईल टेस्टिंग व्हॅनची सुद्धा सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राधाकृष्णन बी यांनी सांगितले की, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मनपातर्फे प्रत्येक सॅम्पलची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. यामधून दोन रुग्णांना बी ए ५ व्हेरियंटची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असून ते घरी आयसोलेशनमध्ये आहेत. नागपुरात विदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांची माहिती गोळा करणे सुरु आहे. ज्यांना कोरोनाची थोडीही लक्षणे आढळली अशांची चाचणी केली जात आहे. यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टिम अर्थात आर.आर.टी. चमू तैनात करण्यात आलेली असल्याचेही आयुक्तांनी सांगतिले.