येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट;आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

धाराशिव :- तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे  तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

सादरीकरणादरम्यान जिल्हाधिकारी पूजार यांनी विकास आराखडा राबवताना एकूण 73 एकर भूसंपादनाची गरज असल्याचे तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तुळजापूर विकास आराखड्यासाठी 1866 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाच्या कामाला वेग द्यावा अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली. यामुळे आराखड्यातील कामांनाही गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.

आराखड्यातील महत्त्वाच्या बाबी

तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग घेत शाश्वत विकास करण्यासाठी तुळजापूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भाविकांचा त्रास कमी करून त्यांना श्री तुळजाभवानी देवीचे सुलभ व जलद दर्शन मिळावे, सध्याच्या पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास करून नवीन पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्याचे काम या आराखड्याच्या अंमलबजावणीतून होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

मंदिराचा इतिहास, संस्कृती, वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे.गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीम, ऑनलाईन दर्शन व्यवस्था, भाविकांच्या संख्येचे नियमन, रस्त्यांचे रुंदीकरण, वैकल्पिक मार्ग तयार करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची वाहतूक सेवा, शौचालयांची संख्या वाढवणे, कचरा वर्गीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सुविधांचा विस्तार, विश्रांती स्थळे, भाविक सुविधा केंद्राची उभारणी, वॉटर कुलर व आरामदायक शौचालयाची सुविधा, सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल पद्धती (ॲप) चा वापर अशा काही सुधारणा या आराखड्यात समाविष्ट आहेत.मंदिर परिसरात मंदिर परिसीमा वाढवणे,मंदिर शिखर संवर्धन, कुंड, तीर्थ सुधारणा व संवर्धन, इतर मंदिर संवर्धन,विद्युतीकरण, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, सुरक्षा व टेहळणी व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा इत्यादीचा समावेश आराखड्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांना दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रेडीओ क्लब जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

Sun Mar 30 , 2025
मुंबई :- गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात रेडीओ क्लब येथे जेट्टीचे बांधकाम करण्यात येत आहे. या जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले. जेट्टी निर्माणामुळे येणाऱ्या अडचणी, शंका व होणारी गैरसोय, सूचना आदींबाबत विधान भवनातील कॅबिनेट कक्षात स्थानिकांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांशी चर्चेदरम्यान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!