नवी दिल्ली :- धडधाकट खेळाडूंप्रमाणे बॅडमिंटन कोर्टवर सध्या तुलिका जाधव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सेरेब्रल पाल्सी (cerebral palsy) या जन्मजात विकाराने ग्रस्त तुलिका दिव्यांग असूनही कोर्टवरील हालचाली आणि खेळाडूंसाठी आवश्यक असलेली ऊर्जा यात कुठेही कमी पडत नाही. हा आजार व्यक्तीच्या हालचाली, स्नायूसह एकूणच देहबोलीवर परिणाम करतो. असे असूनही केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर केवळ गंमत म्हणून बॅडमिंटन खेळायला लागलेली तुलिकाची मजल पॅरालिम्पिकपर्यंत गेली आहे.
दिव्यांग असूनही खेळात प्राविण्या मिळविणारे पलक जोशी आणि प्रमोद भगत हे तुलिकाचे आदर्श आणि प्रेरणास्त्रोत. सध्या सुरु असलेल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत एसएल ३ प्रकारात खेळताना तुलिकाने उपांत्य फेरी गाठली आहे. कोर्टवर तरी एक, दोन फेऱ्यांपुरती आव्हाने मर्यादित असतात. पण, आयुष्यात जगताना तुलिकासमोर सातत्याने रोज नवी आव्हाने उभी राहतात.
या आजारामुळे तुलिका शरीराच्या उजव्या बाजूने खूप काही करू शकत नाही. तिचे सर्व वजन एकाच पायावर पडत असल्याने पायाच्या दुखापतीची भिती तिच्यासमोर असते. आजाराने दृष्टिवरही मर्यादा निर्माण झाल्यामुळे तुलिकाला चष्मा लावून खेळावे लागते. त्यामुळे शटल परतवताना अंदाज घेणे तुलिकाला काहीसे कठिण जाते. पण, त्यावरही ती मात करते. तुलिका म्हणाली, लहानपणी लोक माझ्याकडे पाहून काय आजर असल्याचे विचारायचे. त्यामुळे इतरांपेक्षा आपण वेगळे असल्याचे सारखे वाटायचे. तेव्हा काहीतरी वेगळे करून दाखवायचेच या ध्येय्याने मला झपाटले आणि २०१८ मध्ये बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आता मला वेगळी ओळख निर्माण झाली आहे आणि याचा मला अभिमान आहे.
भारताचे प्रतिनिधीत्व करण्याच्या तुलिकाच्या निर्धारामुळे तिने प्रशिक्षणासाठी शहरे फिरवली. ती आता लखनौमध्ये राहते जिथे ती गौरव खन्ना यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेते आणि तिला वाटते की तिथली इको सिस्टीम आत्मविश्वास निर्माण करते. “विविध आव्हाने असलेले अनेक खेळाडू आमच्यासोबत प्रशिक्षण घेतात आणि जेव्हा मी त्यांच्यासोबत असते तेव्हा मला वेगळे वाटत नाही. खरं तर एक खेळाडू म्हणून विकसित होण्यासाठी मला अधिक प्रोत्साहन मिळते,” तुलिका व्यक्त करते.
प्रथमच खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये भाग घेणे म्हणजे तिच्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे टाकण्यासारखे आहे असे तिचे मत आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहण्यासाठी आपल्याला कुटुंबाकडून खूप साथ मिळाली हे सांगायला तुलिका विसरत नाही. लहानपणापासूनच मला हा विकार जडल्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत आई वडिलांनी माझी साथ सोडली नाही. सावलीसारखे ते माझ्याबरोबर असतात. येथे येण्याचा आनंद मी लुटत आहे. खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा या दिव्यांग खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे, असे तुलिका म्हणाली.