– ‘ट्रायबल कॉन्क्लेव्ह’मध्ये प्रकट मुलाखत*
नागपूर :- आदिवासी समाज जंगलांच्या सानिध्यात असतो. जंगलांमध्ये रोजगार देण्याची मोठी क्षमता आहे. तेथील कोणत्या कच्च्या मालापासून कोणते उत्पादन तयार होते आणि त्याची जगात कशी मागणी आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. ज्या उत्पादनांची देशात आणि देशाच्या बाहेर मोठी मागणी आहे, त्याच्या निर्मितीच्या क्षेत्रात आदिवासी तरुणांनी उद्योग करायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केली.
आदिवासी औद्योगिक विकास प्रतिष्ठानतर्फे धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात आयोजित ‘ट्रायबल कॉन्क्लेव्ह’मध्ये ना. नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी ना. गडकरी यांनी आदिवासी तरुणांना स्वतःसोबत समाजाच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘आपण ज्या भागात राहतो, त्या भागाच्या क्षमता आणि रोजगाराचे स्रोत ओळखा. ज्याला जगात मागणी आहे, असे एखादे उत्पादन शोधून काढा. छोट्या उत्पादनांना एक मर्यादा आहे. त्यातून रोजगाराचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार नाही. आपल्यासोबत समाजातील गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर मोठा विचार करावा लागेल. लोक काय स्वीकारू शकतात याचे संशोधन करावे लागेल आणि आपल्या प्रयोगाला तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल.’ ‘जल, जमीन, जंगल आणि जानवर’ या संकल्पनेला तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल, याचा विचार तरुणांनी करणे गरजेचे आहे. कुठलाही उद्योग करताना तंत्रज्ञान, बाजारपेठेतील मागणी आणि कच्च्या मालाची उपलब्धता या तीन गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आदिवासी बहुल भागात उद्बत्तीच्या काड्या तयार होतात आणि त्याला विदेशात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यातून अनेकांना रोजगार मिळत आहे. यासाठी उद्यमशीलता आणि मोठा दृष्टीकोन या दोन्ही गोष्टींची नितांत गरज आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.
*‘सिकलसेलच्या समस्येवर विचार करा’*
सिकलसेल आणि थॅलेसिमिया या आदिवासी समाजाच्या सर्वांत मोठ्या समस्या आहेत. पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. उत्तर नागपूरमध्ये ८० हजार रुग्ण आहेत. काही दिवसांपूर्वी मी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये ५० मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले. ही शस्त्रक्रिया खूप महाग आहे. गरिबांना परवडणारी नाही. अशा परिस्थितीत आपला समाज उध्वस्त होण्यापासून वाचवायचा असेल तर सिकलसेल आणि थॅलेसिमियाची समस्या दूर करण्यासाठी उपाय शोधून काढा, असे आवाहन ना. नितीन गडकरी यांनी आदिवासी तरुणांना केले. यावेळी आदिवासी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक समस्या समजून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.