मुंबई :- अनुसूचित जमातीच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या योजना व सुविधा यांच्याकरिता सल्ला देण्यासाठी जनजाती सल्लागार परिषद कार्यरत असून या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीची बैठक ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित करण्यात आली असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य आमश्या पाडवी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री डॉ.गावित म्हणाले की, या परिषदेची 5 जानेवारी 2023 रोजी पुनर्रचना करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये याची बैठक प्रस्तावित असून सर्व संबंधित आमदार आणि निमंत्रितांना बैठकीसाठी विषय सूचविण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. ज्या सदस्यांना अद्याप पत्र प्राप्त झाले नसेल त्यांना ते तातडीने पोहोचविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.