– बुधवारपासून शारीरिक चाचणीला सुरवात
नागपूर :- पोलिस शिपाई, चालक, बॅड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई, तुरंग विभाग शिपाई पदासाठी येत्या बुधवार १९ जून पासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलिस मुख्यालयात शारीरिक चाचणी होणार असून याकरिता सर्व तयारी झाली आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक राबविली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी पत्रपरिषदेत दिली.
माहिती देताना डॉ. सिंगल यांनी सांगितले, संपूर्ण राज्यभरात ही भरती प्रक्रिया १९ जूनपासून सुरू होणार आहे. सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील हे निवड मंडळाचे अध्यक्ष आहेत. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात शारीरिक चाचणी घेण्यात येईल. मुख्यतः चाचणीचा वेळ हा सकाळचा असून सकाळी ९ वाजता पर्यंत शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर उन्हाची दाहकता पाहून साधारण ५ वाजता उर्वरित उमेदवारांची चाचणी घेण्यात येईल. वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू भरती वेळेस तैनात राहणार आहेत. त्यामुळे आकस्मिक प्रसंग ओढवला तर उमेदवारांना त्वरित वैद्यकीय मदत दिली जाईल. भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांना काही शंका किंवा तक्रारी असल्यास त्यांच्यासाठी तक्रारपेटी ठेवल्या जाईल. यात उमेदवार न घाबरता तक्रार करू शकतात. त्यामुळे उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. विविध पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच दिवशी शारीरिक चाचणी येऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे. त्यांना दोन्ही चाचणीचे अंतर किमान ४ दिवसाचे देण्यात आले आहे. मात्र, त्याकरिता उमेदवारांना चाचणीच्या वेळी लेखी माहिती देणे आवश्यक असल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर आदी अधिकारी उपस्थित होते.
अशी राबविण्यात येईल भरती प्रक्रिया
– शहर पोलिस आयुक्तालयात ३४७ पदांकरिता भरती
– एकूण २९ हजार ९८७ अर्ज प्राप्त
– पुरुष उमेदवार अर्जांची संख्या २२ हजार २६९
– महिला उमेदवार अर्जांची संख्या ७ हजार ७१३
– तृतीयपंथी उमेदवार अर्जांची संख्या ०५
– कारागृह शिपाई भरती २५५ पदाकरिता होणार
कारागृह पोलिस शिपाई भरती
– कारागृहकरिता ५५ हजार २९७ अर्ज प्राप्त
– पुरुष उमेदवार अर्जांची संख्या ३९ हजार ६७४
– महिला उमेदवार अर्जांची संख्या १५ हजार ६१८
– तृतीयपंथी उमेदवार अर्जांची संख्या ०५
शारीरिक चाचणीसाठी पोलिसांचा बंदोबस्त
– पोलिस उपायुक्त- २
– सहायक पोलिस आयुक्त- ३
– पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक- ४६
– पोलिस अंमलदार- २६१
– मंत्रालयीन कर्मचारी- ५५