– उच्च शिक्षणात परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल
यवतमाळ :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व अमोलकचंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पदवीस्तर अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचा उद्देश शिक्षकांना त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्ये शैक्षणिक धोरण प्रभावीपणे लागू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, साधने आणि ज्ञानाने सुसज्ज, सक्षम करणे असा होता.
कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राममनोहर मिश्रा यांच्या हस्ते झाले. सद्या शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीचा संक्रमण काळ असून आपल्यापुढे अनेक प्रश्न आहेत. प्रभावी अंमलबजावणीमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे डॉ.मिश्रा यांनी सांगितले. कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध उच्च शैक्षणिक संस्थांमधील विविध विषयांचे सुमारे 200 प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यशाळा विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्या शाखा, मानव विज्ञान विद्या शाखा, आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेच्या विषयांवर तीन वेगवेगळ्या सत्रात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस विद्यापिठाच्या ईनोव्हेशन आणि इन्क्यूबेशन कक्षाचे संचालक प्रा.डॉ.अजय लाड, श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ.विद्या शर्मा व डॉ.अण्णा वैद्य, अमोलकचंद महाविद्यालयाचे डॉ.आर.बी. भांडवलकर, विद्यापिठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.वैशाली गुडधे, एस.पी.एम. विज्ञान आणि गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय घाटंजीचे डॉ.तुषार कोटक व लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांनी मार्गदर्शन केले.
तज्ञ प्राध्यापकांनी विद्या शाखानिहाय शैक्षणिक धोरणाची रचना, अभ्यासक्रम फ्रेमवर्क, प्रमुख आणि किरकोळ विषय, जेनेरिक इलेक्टिव्ह, ओपन इलेक्टिव्ह, क्षमता वर्धित अभ्यासक्रम, भारतीय ज्ञान प्रणाली, मूल्य शिक्षण कौशल्य, व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम, ऑन-द-जॉब ट्रेनिंग, शैक्षणिक बँक क्रेडिट आणि तिची हस्तांतरण यंत्रणा, वर्कलोड गणना, परीक्षा, मूल्यमापन आणि मूल्यमापन योजना, विद्याशाखानिहाय कोड वाटप, धोरण कार्य समिती, तिचे अधिकार आणि कर्तव्ये, अध्यक्ष आणि अध्यापन पध्दती याबाबत मार्गदर्शन केले.
व्याख्यानानंतरच्या प्रत्येक संवाद सत्रात सहभागी प्राध्यापकांनी तज्ञ प्राध्यापकांसोबत संवाद करीत त्यांच्या शंका आणि धोरणाची अंमलबजावणी करतांना येणाऱ्या संभाव्य अडचणी बाबत प्रश्न उपस्थित केले व तज्ञांनी त्याची उत्तरे दिली. कार्यशालेत प्राध्यापक सदस्यांनी शिक्षण क्षेत्रातील बदल स्वीकारण्यासाठी आवश्यक साधने, कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त केले. अंतर्गत गुणवत्ता हमी समिती सदस्य डॉ. प्रशांत मुस्कावार यांनी संपूर्ण कार्यशाळेत तांत्रिक सहाय्य प्रदान केले. डॉ.ए.एस.सुर्यकार यांनी संचालन केले तर आभार डॉ.माधुरी भादे यांनी मानले.
प्राचार्य डॉ.राममनोहर मिश्रा व अंतर्गत गुणवत्ता हमी समिती समन्वयक प्रा.डी.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डॉ.देवदत्त धारणे, डॉ.अश्विन अतकुलवार, डॉ.आनंद काकडे, डॉ.प्रवीण जाधव आणि डॉ.अमोल चंदनखेडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी संतोष गौर, डिक्कर, माळकुटे, हेडाऊ, नंदूरकर, पवार यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.