संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जून महिना कोरडा गेल्यानंतर दमदार व पुरेसा पाऊस नसूनही तुरळक पावसाच्या भरवशावर कामठी तालुक्यातील शेतकऱ्यानी खरिपातील सोयाबीन,धान,तूर,मूग उडीद,कापूस आदी पिकांची पेरनी केली.परंतु कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची गरज असताना पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळा कडे लागल्या आहेत.
गतवर्षी खरिपातील नापिकीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना यावेळी तरी चांगला पाऊस पडून पिके चांगली येतील अशी आशा असताना पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकतम भर पडत असल्याचे दिसुन येत आहे.पेरणीनंतर उगवलेल्या बिजाकुरांना जागविण्यासाठी शेतकऱ्यांना अहोरात्र डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागत आहे.एकूणच कामठी तालुक्यातील खरिपाची पेरणी पूर्णत्वाकडे गेली असून आता फक्त दमदार पावसाची एन्ट्री व्हावी अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून आहे. कामठी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने बैल,तिफन, सरते यांच्या सहाय्याने पेरणी केली आहे.तर यावर्षी दमदार पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी तुरळक पावसावर पेरणी केली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सारख्या यंत्राचा वापर करूनही पेरणी केली आहे.पावसा संदर्भात दरवर्षी वेगवेगळे अंदाज वर्तविन्यात येत असून शेतकऱ्यांना मात्र दमदार पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे.