लंम्पीसदृश्य आजाराचे एकूण वीस बाधित, एका बैलाचा मृत्यू : 10 हजार लसीकरणाचे उद्दिष्टय

लक्षणे दिसताच ईलाज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नागपूर :- लंम्पी हा आजार जनावरातील कोरोना प्रादुर्भावासारखा असून त्यावर उपाययोजना करताना ज्या ठिकाणी उद्रेक झाला त्यावर इलाज करण्यात येईल. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वीस जनावरांना लागण झाली असून त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दहा हजार लसीकरणाचे उद्दिष्ट घेतले असून आतापर्यंत 4 हजार लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

या आजारावर इलाज असून 100% यातून जनावरे बरी होतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र लक्षणे दिसताच लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जवळच्या पशुसंवर्धन केंद्रात किंवा ग्रामपंचायतीला माहिती द्यावी ,असे आवाहन त्यांनी आज येथे केले. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. त्यांनी देखील जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व संलग्न मनुष्यबळ या आणीबाणीच्या परिस्थितीत ज्या ठिकाणी उद्रेक आहे. त्या ठिकाणी एकत्रित झाला असून या साथ रोगाचा बिमोड करण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ मोहन खंडारे उपस्थित होते.

राज्य शासनामार्फत मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लंम्पी चर्मरोग हा संसर्गजन्य व घातक प्रकारचा रोग असल्याने रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुपालक शेतकरी व शासनाची विविध विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील सात नमुने पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गुरांची खरेदी विक्री बंद करण्यात आली असून गुरांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. अशा प्रकारे वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पाच किलोमीटर त्रिजेमध्ये येणाऱ्या गावातील गोवर्गीय पशुंना शेळ्यांच्या देवीवरील लसचा वापर करून प्रतिबंधात्मक लसीकरण तत्काळ करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहे. निरोगी जनावरांमध्ये आजाराची लागण होऊ नये म्हणून निरोगी जनावरे वेगळी ठेवण्याबाबत प्रत्येक गावात सूचना देण्यात आली असून याचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले आहे.

प्रादुर्भावामुळे पशु मृत झाल्यास शास्त्रोत्र पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांची राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील बडेगाव व उमरी जांभळा पाणी तसेच हिंगणा तालुक्यातील जुनेवाणी येथील गुरांना चर्मरोगचा दृश्य लक्षणे आतापर्यंत दिसून आली आहेत. ही संख्या वीस आहे. बडेगाव येथील बैल सदृश्य आजारामुळे मृत्युमुखी पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तथापि, हा आजार जनावरांपासून माणूस प्रजातीमध्ये पसरण्याची शक्यता नाही. अशा पद्धतीचे कोणतेही तथ्य अद्याप मानण्यात आलेले नाही. जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गौशाळा रस्त्यावरील मोकाट जनावरे यांच्याबाबतीतही प्रशासन लक्ष ठेवून असून अनेक ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येईल. यासंदर्भात राज्य शासनाचा 1962 हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असून नागरिकांना अशा पद्धतीचे जनावर आढळून आल्यास त्याची माहिती ते या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकतात. कळपाणे गुरे पाळणाऱ्या गोपालकांना देखील माहिती देण्यात येत असून सतर्क करण्यात आले, असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अग्निवीर चाचणीसाठी मानकापूर क्रीडा संकुल सज्ज

Fri Sep 16 , 2022
जिल्हाधिकारी इटनकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी नागपूर  :- अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया 17 तारखेपासून मानकापूर क्रीडा संकुल येथे सुरू होत असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मानकापूर येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने उमेदवारांच्या निवडीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 17 सप्टेंबरच्या रात्री बारा वाजता पासून निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मानकापूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com