वाचकांना घडविण्यासाठी साहित्यिक व ग्रंथालयाची भूमिका यावर विचारमंथन
नागपूर :- समृद्ध व आशय संपन्न साहित्य चांगल्या वाचकांना हवे असते. वाङ्मय व्यवहाराची समृद्धी ही वाचकांवर अवलंबून असून दुसऱ्या बाजूला वाचकांना डोळस करण्याची जबाबदारी लेखकांवर आहे. हे लक्षात घेता अधिकाधिक सकस साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथालयांचे योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन बिंझाणी नगर महाविद्यालयाच्या मराठी विभागचे प्रमुख डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले.
“वाचकांना घडविण्यासाठी साहित्यिक व ग्रंथालयाची भूमिका” याविषयावर विदर्भ साहित्य संघ येथील अमेय दालनात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते, डॉ. अजय कुमार आगाशे, नितीन नायगांवकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, ग्रंथपाल डॉ. विजय खंडाळे प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे आदींची उपस्थिती होती.
वाचक समृद्ध झाला म्हणजे समाज समृद्ध होतो. यासाठी समृद्ध वाचनव्यवहार वाढला पाहिजे. वाङ्मय व्यवहाराचा प्राण हा वाचक आहे. चांगल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी साहित्यिकही उत्सुक असतात असे डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी सांगितले.
वाचन संस्कृती विविध माध्यमातून समृद्ध होत आहे. यासाठी विविध माध्यम उपलब्ध असून युवापिढी याचा चांगल्या पद्धतीने वापर करीत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रंथालय सुद्धा अत्याधुनिक असायला हवी – नितीन नायगावकर
वाचकांनी काय वाचावे व कसे वाचावे यासाठी ग्रंथालय चांगले मार्गदर्शन करू शकतात. वाचनाची माध्यमे जशी बदलली आहेत त्यानूसार ग्रंथालय सुद्धा अत्याधुनिक व्हायला हवीत असे नितीन नायगांवकर म्हणाले.
यावेळी डॉ. अजय कुमार आगाशे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी उत्तम समाज निर्मितीसाठी ग्रंथालयांच्या योगदानाला अधोरेखित केले. प्रत्येक गावातील ग्रंथालय अधिक समृद्ध होण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रारंभी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी परिसंवादातील व्यक्त्यांचे ग्रंथ देवून स्वागत केले. सुत्रसंचलन अर्चना गाजलवार यांनी तर आभार ग्रंथपाल अश्विनी वानविकर यांनी मानले.