राज्यात आजपर्यंत 1 कोटी 63 लाख 60 हजार पीकविमा अर्ज दाखल

– लाखो शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा,

– आज विमा भरण्याचा अखेरचा दिवस – कृषी मंत्री धनंजय मुंडे

– प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत देखील महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर;

– गुंतवणूक व अनुदान मिळून 1710 कोटींची वर्षात उलाढाल

मुंबई :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. खरीप 2024 हंगामात 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 1 कोटी 63 लाख 60 हजार पेक्षा अधिक पीकविमा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज 31 जुलै हा विमा भरण्यासाठी अखेरचा दिवस असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपला विमा तात्काळ भरून घ्यावा व आपले पीक विमा संरक्षित करावे असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विम्यासह विविध योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या 24 तासात राज्यभरातून तब्बल 5 लाख 74 हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी वीज पंपांना पूर्णपणे मोफत वीज देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित करून ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’स आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. याचा लाभ राज्यातील सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सुमारे 14 हजार 760 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कापूस-सोयाबीनला हेक्टरी 5 हजारांचे अनुदान

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कापूस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. सुमारे 4200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लाभ राज्यातील सुमारे 83 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यात सुमारे 53 लाख 83 हजार सोयाबीन उत्पादक (एकूण लाभ – 2612.48 कोटी) तर सुमारे 29 लाख 90 हजार कापूस उत्पादक शेतकरी (एकूण लाभ – 1541 कोटी) शेतकऱ्यांना लाभाचे वितरण डीबीटीद्वारे थेट संलग्न बँक खात्यांवर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक पीकविमा

खरीप 2023 मध्ये एक रुपयात पीकविमा ही योजना प्रथमच अंमलात आली होती. त्यानंतर खरिपात राज्यात बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती आणि हवामानातील असमतोल यामुळे झालेल्या नुकसानीच्या पोटी विमा धारक शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रीम, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात व पीक कापणी प्रयोगानंतर असे मिळून आतापर्यंत एकूण 7,280 कोटी रुपये इतका पीकविमा मंजूर करण्यात आला असून यांपैकी 4,271 कोटी रुपयांची वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर 3,009 कोटी रुपये विमा रक्कम वितरण सुरू आहे. तसेच पीक कापणीचे अंतिम अहवाल निश्चितीनुसार या रक्कमेत आणखी वाढ होणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून देशात सर्वाधिक पीकविमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. तसेच योजना सुरू झाल्यापासून ही रक्कम आजवरची सर्वाधिक पीकविमा रक्कम असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत देशात अव्वल

महाराष्ट्र राज्य हे देशात डाळींच्या उत्पादनात अग्रेसर असून आता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतही महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. या योजनेद्वारे प्रकल्प किमतींच्या 35% किंवा 10 लाख रुपये बँक कर्जाशी निगडित या प्रकारे गुंतवणूक व अनुदान योजना राबविली जात असून या योजनेतून मागील एक वर्षात तब्बल 1710 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

आगामी काळात जलयुक्त शिवार 2.0, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2, कृषी क्षेत्रात पेरणी पूर्वी मातीचे परीक्षण ते अगदी सूर्यकिरणांचा योग्य वापर यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वतोपरी वापर करण्याच्या दृष्टीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा शेतीसाठी उपयोग करण्यासाठी विशेष संशोधन या तीन महत्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून आणखी कामे शेतीच्या उन्नतीसाठी हाती घेण्याचे नियोजन कृषी विभाग करत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जपानने महाराष्ट्राच्या उद्योग, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Aug 1 , 2024
– जपानचे कॉन्सुलेट जनरल यागी काजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट मुंबई :- महाराष्ट्र हे उद्योगस्नेही आणि गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. भविष्यात देखील जपानने राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com