नागभीड :- शाळांच्या माध्यमातून आपल्याला या देशाशी एकरूप असणारा, तन्मय असणारा तसेच या देशाच्या विचारांशी आणि आचारांशी बांधील असलेला नागरिक घडवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. यातूनच त्या व्यक्तीचा विकास होईल, भारत मोठा होईल आणि जगाला सुख-शांतीचा मार्ग गवसेल, असेही ते म्हणाले.
नागभीडच्या गोंडवन विकास संस्थेचा सुवर्ण जयंती महोत्सव आणि स्व. ज. स. जनवार शताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात सरसंघचालक बोलत होते. व्यासपीठावर गोंडवन विकास संस्थेचे अध्यक्ष राजा देशपांडे, सचिव रवींद्र जनवार आणि आमदार कीर्तिकुमार भांगडिया उपस्थित होते.
शिक्षणातून स्वस्वरूप ओळखता येते, त्यातून स्वावलंबनही येते. आपल्या शैक्षणिक संस्थेतून शिकून गेलेले विद्यार्थी आपल्या पायावर उभे झाले पाहिजे. त्यांनी तक्रारी करीत बसायला नको. त्यांच्यात इतका आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की, जगात जेथे जाईल तेथे आपल्या पायावर उभा राहून, त्याला आपल्या परिवाराचे पोट भरता यायला हवे, अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी व्यक्त केली.
शालेय शिक्षणातून मुलांना दिशा मिळते. जगण्याचे सामर्थ्य, आत्मविश्वास मिळतो. आपल्याला चांगला मनुष्य, देशाचा जबाबदार नागरिक आणि विश्वमानवतेचा उत्कृष्ट घटक बनायचे आहे. ही दिशा शालेय शिक्षणातून मिळते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. मोहन भागवत म्हणाले, महाविद्यालयांमध्ये ज्या प्रवृत्ती बनायच्या, त्या बनून गेलेल्या राहतात. त्यावेळी स्वभाव बदलणे कठीण होते. शैशवावस्थेत स्वभाव घडतो. हे जडणघडणीचे वय असते. त्या काळात मुले आपल्या हातात असतात. त्यांना असे वळवता आले पाहिजे म्हणून शाळा असतात. अशा शाळा चालवल्या म्हणून आपण जनवार गुरुजींची जन्मशताब्दी साजरी करीत आहोत. हाच विचार करून संघ आणि संघ विचारांच्या शाळा चालतात.
सरसंघचालक पुढे म्हणाले की, शिक्षण हे उदाहरणातून मिळते. भाषण आणि पुस्तकातून त्याचा पुरेसा बोध होत नाही. जसे आहे तसे दिसते आणि ते पुस्तकाशी व भाषणाशी जुळते, तेव्हा त्याचा परिणाम होतो. आपल्यासारखे लोक परिश्रम करून चांगले होतात. त्याचे अनुकरण मुले करतात. घरून पालकांनी दिलेली दिशाही महत्त्वाची असते. आपण मुलांना नेहमी खूप पैसा मिळव, हेच सांगत राहिलो तर तो पुढे आपल्यालाही विचारणार नाही. निव्वळ पैसा मिळवेल.
आपण रवींद्र जनवार यांच्या वडिलांची जन्मशताब्दी साजरी करीत आहोत. त्यांनी मूल्यशिक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. गोंडवनाचा विकास व्हावा अशी त्यांची इच्छा होती. स्वत्वाकडे वळले की विकास होतो. शिक्षणातून आपल्या स्वरूपाचे दर्शन होते. मुक्ती, मोक्ष म्हणजे आपल्या स्वरूपाचे दर्शन. मी कोण हे ओळखणे हे सर्वात मोठे शिक्षण आहे. “सा विद्या या विमुक्तये” असे आपल्याकडे म्हंटले आहे. म्हणजे विद्या ती, जी मुक्त करते. अशा प्रकारची विद्या देणारी विद्यालये स्थापन करण्यासाठी जनवार गुरुजींनी आपले आयुष्य खर्ची घातले, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.
हे माझं हे तुझे हे छोट्या बुद्धीचे विचार आहेत. ज्यांचे हृदय विशाल आहे, ते संपूर्ण विश्वाला आपले कुटुंब मानतात. आपण हिंदू आहोत अशी आपली ओळख पटली की आपोआप हा विचार मनात येतो. असे शिक्षण मिळाले पाहिजे, त्या शिक्षणातून विकास होतो. चांगले शिकून लोक शहरात न जाता खेड्यापाड्यात राहतात. कारण काय आपलेपणा. हा आपलेपणा शिकवला की बाकीच्या गोष्टी आपोआप येतात. संपूर्ण देशात आपलेपणा उत्पन्न झाला पाहिजे, हा संघाचा विचार आहे आणि हाच हिंदूंचा परंपरागत विचार आहे. संविधानाचाही तोच विचार आहे. देशात भावनिक एकता उत्पन्न झाली पाहिजे, असा स्पष्ट उल्लेख संविधानाच्या मार्गदर्शक तत्वात आहे. शाळेतून हे शिक्षण मिळावे, अशी जनवार गुरुजींची अपेक्षा होती, म्हणून त्यांनी अशा शाळा सुरू केल्या, ही बाबही सरसंघचालकांनी अधोरेखित केली.