संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून मुलभूत हक्काचा विचार सर्वदूर पोहोचेल – ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा विश्वास

– महाड येथून यात्रेला सुरूवात

नागपूर :- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्रद्वारे संविधान जागर यात्रा संपूर्ण राज्यभर काढण्यात येत आहे. भारताच्या संविधानातील कधीच न बदलणारे मुलभूत हक्क आणि संविधानाच्या हत्येचा प्रयत्न करणारी काँग्रेस हे वास्तव आणि यातील विचार संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि संविधान जागर समितीचे संयोजक सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेल्या महाडच्या भूमीतून शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी संविधान जागर यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी ॲड. मेश्राम बोलत होते. मंचावर आमदार भरत गोगावले, संविधान जागर समितीचे संयोजक जेष्ठ मानव अधिकार कार्यकर्ता, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. वाल्मीक (तात्या) निकाळजे, कर्मवीर दादासाहेव गायकवाड यांचे नातू, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, जयभीम आर्मीचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष नितीन मोरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश गद्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी, माजी खासदार बाळासाहेब साळुंके यांचे सुपूत्र काश्यप साळुंके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माजी सदस्या योजना ठोकळे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष तथा घे भरारी महिला बचत गटाच्या अध्यक्ष स्नेहा भालेराव, जयभीम सेनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय कांबळे, ऐतिहासिक धम्मभूमी ट्रस्ट देहुरोड तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव राजू माने, फुले, शाहू, आंबेडकरी कार्यकर्ता आकाश अंभोरे, भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनीचे प्रदेश संघटक डॉ. विजय मोरे, बौद्ध युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय गव्हाळे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नागसेन पुंडके, ऍड राहूल झांबरे, संघपाल मेश्राम, डॉ आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रकाश कांबळे , डॉ आंबेडकर फाउंडेशन च्या सदस्या योजना ठोकळे, आदी उपस्थित होते.

९ ऑगस्ट ते ८ सटेंबर २०२४ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संविधान जागर यात्रा पोहोचेल व तिथे संविधानाच्या मुलभूत हक्काबाबतचे विचार पोहोचविणार आहे. महाड येथील सभेत बोलताना ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बाबासाहेबांच्या सर्वांना सोबत घेउन पुढे जाण्याच्या विचाराचा अवलंब करून यात्रा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांनी बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा ब्राम्हण आणि उच्चवर्णीयांना सोबत घेउन केल्याचे नमूद केले. काँग्रेस मात्र देशात दलित आणि ब्राम्हण, उच्चवर्णीय असा जाणीवपूर्वक भेद पुढे आणत आहे, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने संविधान धोक्यात असल्याचा कांगावा करून देशभरातील जनतेला भ्रमित केले. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसच्या काळात जेवढ्या वेळा संविधानावर हल्ले झाले आणि संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला तेवढा इतिहासात कधीच झाला नसल्याचे ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात केशवानंद भारती प्रकरणाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, ४२ व्या घटनादुरुस्तीने तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी प्रास्ताविकेमध्ये देखील दुरुस्ती केली. पण केवळ प्रस्ताविकेमध्येच दुरुस्ती केली असे नाही तर संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर अर्थात मूळ गाभ्याला देखील हात लावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर कोणत्याही न्यायालयाला ‘कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटला रिव्ह्यू’ करण्याचे अधिकार नाहीत अशा पद्धतीची देखील तरतूद नोंदविली. इंदिरा गांधी यांनी ४२व्या घटनादुरुस्तीने प्रास्ताविकेमध्ये बदल केला. गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब आणि केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरला या दोन्ही खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संवैधानिक खंडपीठाने संविधानाची मूळ चौकट बदलता येणार नाही, असा निकाल दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत संविधानाचा आत्मा बदलता येणार नाही हे सर्व विधीत आहे. यावर अनेकदा चर्चा देखील झाली. मात्र असे असतानाही काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रस्थापित माध्यमांना हाताशी धरून जनतेमध्ये भ्रम पसविण्याचे काम करण्यात आल्याचेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.

देशात पंडीत जवाहरलाल नेहरूनंतर, इंदिरा गांधी पुढे राजीव गांधी यांनी नेतृत्व केले. आता राहुल गांधी यांना नेतृत्व सोपविण्यासाठी देशाचे संविधान धोक्यात आणण्याचा काँग्रेसने कांगावा केला. देशाची ७० वर्षे सत्ता भोगूनही देशातील दलित, मागासांच्या उन्नती आणि उत्थानासाठी कुठलीही ठोस भूमिका घेणारे आज पुन्हा एकदा स्वत:च्या स्वार्थासाठी संविधानाच्या नावाने देशातील दलित, मागासांना वेठीस धरत असल्याचा आरोपही ॲड. मेश्राम यांनी केला. काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय शाखेचे प्रमुख सॅम पित्रोदा नावाचा नेता ‘संविधान निर्मितीत पंडीत जवारलाल नेहरूंचा वाटा होता पण बाबासाहेब आंबेडकरांचे कुठलेही योगदान नव्हते’, असे विखारी वक्तव्य करतो आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जून खरगे हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून वेळ मारून नेतात हे निंदनीय असल्याचे ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नमूद केले.

अशा तिरस्काराच्या आणि स्वार्थाने प्रेरित काँग्रेसच्या राजकारणाविरोधात संविधान जागर यात्रा एक वैचारिक शस्त्र म्हणून काम करणार आहे. या वैचारिक शस्त्राने काँग्रेसचा दिशाभूल करणारा खोटा बुरखा फाडून टाकला जाईल. संविधानातील मुलभूत अधिकार, त्यांचे झालेले संरक्षण, संविधान बदलाचा खोटा प्रचार आणि काँग्रेसची विखारी भूमिका हे सर्व जनतेपुढे स्पष्ट होईल, असा विश्वास देखील भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि संविधान जागर समितीचे संयोजक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला आहे.

ही संविधान जागर यात्रा महाड येथून आज सुरु होत पुढे संपूर्ण महाराष्ट्र व पुढे नागपूर होत चैत्यभूमी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल अशी देखील माहिती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Sat Aug 10 , 2024
– शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी 1 कोटी घरे बांधण्यात येणार – पीएमएवाय -यू 2.0 अंतर्गत 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2.30 लाख कोटी सरकारी अनुदान नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना शहरी(पीएमएवाय -यू ) 2.0 ला मंजुरी देण्यात आली. योजनेअंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना 5 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com