मुंबई :- त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल आयोजित करणाऱ्या मंडळींकडून धूप दाखविण्याची कोणतीही परंपरा नसताना मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट काही जणांनी धरल्यामुळे मंदिर समितीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी समिती नेमली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी सोमवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके , माध्यम विभाग सह संयोजक ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. मंदिरासमोर धूप दाखविण्याची १०० वर्षांची परंपरा असल्याचा दावा करणाऱ्या खा. संजय राऊत यांनी याचे पुरावे द्यावेत असे आव्हान आचार्य भोसले यांनी दिले.
आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर धूप दाखविण्याच्या घटनेबाबत राज्यात बरीच चर्चा चालू आहे. मंदिरासमोर धूप दाखविण्याची प्रथा १०० वर्षांपासूनची आहे , असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. खा. राऊत यांचा हा दावा सपशेल खोटा आहे. या घटनेसंदर्भात स्थानिक शांतता समितीने पत्रकार परिषदही घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत मंदिराबाहेरच्या चौकात धूप दाखविण्याची प्रथा आहे , असे सांगण्यात आले होते. असे असताना काही मंडळी या वादाला विनाकारण वेगळे वळण देत आहेत.
प्रत्येक मंदिर , धार्मिक स्थळात प्रवेशाबाबत वेगवेगळे नियम असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरात कोणाला प्रवेश द्यावा याचे नियम मंदिर समितीने केले आहेत. या मंदिरात प्रवेश करून धूप दाखविण्याची कोणतीही परंपरा नव्हती. चौकात धूप दाखविण्याची परंपरा असताना यावर्षी काही व्यक्तींनी मंदिरात प्रवेश करून धूप दाखविण्याचा हट्ट धरल्यामुळे मंदिर समितीने त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी ज्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यापैकी एक असलेल्या सलमान अकील सय्यद याच्याविरुद्ध २०१८ मध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्याच्याविरुद्ध नाशिक न्यायालयात खटला चालू आहे, उरूस आयोजकांपैकी काही मंडळी गुन्हेगारी कृत्यांशी संबंधित असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे, अशी माहितीही आचार्य भोसले यांनी दिली. ही माहिती आपण विशेष चौकशी समिती (एसआयटी ) कडे देणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.