नागपूर :- मोक्ष प्राप्त करण्याची क्षमता प्रत्येकातच आहे. त्यासाठी संसाराचा त्याग करून गुहेत रहायला जाण्याची आवश्यकता नाही. संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना अध्यात्माच्या मार्गावरही वाटचाल करता येते. मात्र, जगताना जगाचे काही हित साधता येईल अशी कृती आपल्याकडून घडायला हवी, असा हितोपदेश आध्यात्मिक गुरू पद्मभूषण श्री एम यांनी आज नागपूरकरांना दिला.
‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘सत्संग फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘सकाळ माध्यम समूहा’चे कार्यकारी संचालक अभिजित पवार उपस्थित होते. आपल्या प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे. आपण सर्व एकच आहोत असे स्वामी विवेकानंद सांगायचे. उपनिषदांमध्येही हेच सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येकातच मोक्ष प्राप्त करण्याची अंगभूत क्षमता आहे. त्याकडे आपले लक्षच नसते. ही क्षमता ओळखून तिला मुक्त करणे हे अध्यात्म आहे. आपण सारे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत हा प्रयत्न सुरू असतो. असे असले तरीही आपल्यात जो ईश्वराचा अंश आहे तो पूर्ण आहे हे ध्यानात ठेवायला हवे, असे एम म्हणाले.
योगाभ्यास म्हणजे केवळ आसने नव्हेत. त्याचा आवाका फार मोठा आहे. त्यासाठी योगोपनिषदाचा अभ्यास करावा लागेल. योगसाधनेवर तब्बल २१ उपनिषदे आहेत. मात्र, त्या साऱ्यांचे बीज शुक्ल यजुर्वेदात आढळून येते. पतंजली यांनी ध्यानसाधनेत चित्ताचे महत्त्व सांगितले आहे. ध्यान करताना मनात चिंता सुरू असते वा वेगवेगळे विचार येत असतात. चिंता किंवा विचार हे चांगले वा वाईटही असू शकतात. यालाच वृत्ती असेही म्हटले आहे. या चिंता वा विचार शांत होतील तेव्हा मन शांत होईल. या स्थितीत मनाचा पुरुष होतो. याच अवस्थेला कैवल्य स्थिती, मोक्ष वा निर्वाण असे संबोधले जाते, असे त्यांनी सांगितले.
आपले कस्तुरीमृगाप्रमाणे आहे. कस्तुरीच्या गंधाने मृग सैरावैरा होतो पण त्याला हे समजत नाही की हा गंध आपल्यातूनच येत आहे. प्रत्येकाला येत असलेले अनुभव हा या गंधाचा आत्मा आहे. हा सुगंध आत शोधणे हा निवृत्ती मार्ग आहे तर बाहेर शोधणे हा प्रवृत्ती मार्ग आहे. म्हणूनच निवृत्ती आणि प्रवृत्तीच्या मार्गावर चालल्यास आत आणि बाहेर असे दोन्हीकडे सर्वे प्राप्त करता येते. हे साध्य करण्यासाठी संसार सोडून पळून जाण्याची गरज नाही. कारण पळून जाणार तरी कुठे? जिथे जाल तिथे मन तर सोबत राहीलच. याचा विचार करून अध्यात्माच्या वाटेवर चालताना आपल्या जगण्यातून लोकांचे हित साधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सत्संग करा, असा मोलाचा सल्ला श्री एम यांनी दिला. आगामी काळात अनेक जण अध्यात्माच्या वाटेवर चालताना लोकांचे व्यापक हित साधण्याचा प्रयत्न करतील, असा आश्वासक आशावाद त्यांनी मनोगताच्या अखेरीस व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा भारद्वाज यांनी केले. प्रारंभिक संवादानंतर श्री एम यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
योगसाधनेला गुहेतून काढण्याचे मिशन
योगसाधनेला गुहेमधून काढून सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे हेच आपले मिशन असल्याचे गुरू श्री एम यांनी संवादाच्या प्रारंभी सांगितले. यात क्रियायोगाचे महत्त्व असले तरीही जो क्रिया करत नाही तोही सच्चिदानंद स्वरूपाच्या शोधातच असतो. मीराबाई यांनी अशी कोणती क्रिया केली होती असा प्रश्न करून क्रिया हा मोक्ष प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि संत परंपरेचा उल्लेख करून हृदयात भक्ती वा प्रेम नसेल तर योगसाधना ही निव्वळ शारीरिक क्रिया ठरेल. त्याने काहीही साध्य होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एम. म्हणाले…
हा सत्संग आहे. भाषण वा व्याख्यान नाही. हा एक आपल्यातील एक संवाद आहे. उपनिषदांमध्येही सर्वत्र संवादच आढळून येतो.
सत्याच्या शोधासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे म्हणजेच
सत्संग.
ज्या हृदयात भक्तीचा अंश नाही ते हृदय स्मशानवत समजावे.
मोक्ष प्राप्त करण्यासाठी सन्यासी होण्याची आवश्यकता नाही.
आध्यात्मिक साधना ही विशिष्ट लोकांनी चोखाळायची वाट आहे हा भ्रम काढून टाका.
यम, नियमाचे पालन करून आत डोकावाल तर पूर्ण आनंदाची अनुभूती होईल.