मुंबई :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्ला येथे असलेल्या भारतमाता मंदिरात दर्शनाला कोणतीही बंदी नाही, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 93 अन्वये याबाबतची सूचना मांडली होती.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, यासंदर्भात मी 20 जून रोजी प्रधानमंत्री यांना पत्र लिहून अशी घटना होऊ नये, अशी विनंती केली. पुरातत्व विभागाने अशी कोणतीही बंदी नाही असे पत्राद्वारे कळविले आहे. तेथे पूजा अर्चा सुरू असून भारतमाता मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री जनार्दन स्वामी मंदिर येथील पर्यटकांसाठी तसेच भाविकांच्या दर्शनासाठी कोणताही प्रतिबंध केलेला नाही. याठिकाणी एकादशी, आषाढी एकादशी, कामिका एकादशी, जनार्दन स्वामी यांची पुण्यतिथी याप्रसंगी येणाऱ्या भाविकांसाठी, वारकऱ्यांसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने विनाशुल्क प्रवेश सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
प्रत्येक दुर्ग किल्ल्यांच्या परिसरात विविध देऊळे आहेत, तेथे स्वच्छता राखण्याबाबत, दिवाबत्ती करण्याबाबत कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या अनुषंगाने केली. त्यावर राज्याच्या अखत्यारीतील स्थळांमध्ये अशी व्यवस्था निश्चित करण्यात येईल, असे मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.