-गरीब रथ मधील बुटीबोरी जवळ थरार
-प्रवाशांच्या डोळ्यादेखत घटना
नागपूर – वार्याच्या गतीने नागपुरच्या दिशेने येणार्या धावत्या रेल्वेतून एका युवकाला फेकले. हा थरार पुणे – नागपूर गरीब रथ एक्सप्रेसमध्ये घडला. गाडीत प्रचंड गर्दी होती. शौचालय आणि दारापर्यंत प्रवासी होते. गर्दीत केवळ धक्का लागला या क्षुल्लक कारणावरून चक्क युवकाला ढकलले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आरोपी शेख शाहरीक (25), रा. अकोला यास अटक करून हत्येचा गुन्हा नोंदविला. ही घटना बुटीबोरी ते गुमगाव दरम्यान गुरूवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडली.
उर्से निमीत्त नागपुरच्या ताजबागमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी आहे. विविध शहरांसह देशविदेशातील भाविकांचे येणे सुरू आहे. दर्शन घेण्यासाठी अकोल्यातील बहुतेक भाविक ताजबागेत येत आहेत. याच श्रृंखलेत अकोल्यातील शेख शाहरीक (25), मृतक शेख अकबर (26), मो. सोहेल (25) यांच्यासह तीन मित्र ताजबागेत येण्यासाठी गरीब रथ एक्सप्रेसने निघाले. गाडीत प्रचंड गर्दी होती. बसायला जागा मिळावी याच प्रयत्नात प्रवासी होते. बहुतेक प्रवासी वॉशरुम आणि दारापर्यंत होते. प्रवाशांच्या गर्दीत शेख अकबर हा दाराजवळ होता. धक्का लागल्यावरून शेख शाहरीक आणि शेख अकबर यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाताच राग अनावर झाल्याने शेख शाहरीकने चक्क शेख अकबरला ढकलले. मात्र, गाडीत गर्दी असल्याने बर्थवरील इतर प्रवाशांना या घटनेसंदर्भात माहितीच नाही.
दरम्यान शेख अकबर दिसत नसल्याने त्याला गाडी खाली ढकलले असावे, असा अंदाज मृतकाचा मित्र मो. सोहेलने वर्तविला आणि इतर मित्रांना सांगितले. सर्वांनी मिळून आरोपी शेख शाहरीकला पकडून मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान गाडी अजनी रेल्वे स्थानकावर थांबली. मित्रांनी आरोपीला पकडून खाली आनले. गर्दी आणि वाद होत असल्याचे पाहून सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेले कर्मचारी धावले आणि धक्कादायक प्रकार समोर आला.
लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिस कर्मचारी प्रवीण खवसे, भुपेश धोंगळी, शैलेश रामटेके आणि शैलेश उके यांना अजनी स्थानकासाठी रवाना केले. आरोपीला ताब्यात घेवून ठाण्यात आणले. फिर्यादी मो. साहिल याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदविला आणि आरोपी अटक केली. घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मेडीकल रूग्णालयात पाठविले आहे.