कर्मवीर दादासाहेबांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा

चंद्रपूर :- तुलनेने अतिशय मागास असलेल्या कष्टकरी समाजात दादासाहेब कन्नमवार यांनी जन्म घेतला, मात्र स्वत:च्या मेहनतीवर त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. दादासाहेब हे ध्येयवादी नेते होते. राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जीवन जगले. अशा नेत्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे मनोगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे बेलार समाज संघटना व रौप्य महोत्सव समितीच्या वतीने आयेाजित कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, सुधाकर अडबाले, माजी मंत्री शोभा फडणवीस, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, आयोजन समितीचे राहुल कन्नमवार, सूर्यकांत खनके आदी उपस्थित होते.

लोकनेते दादासाहेब कन्नमवारांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज येथे उपस्थित राहता आले, याचा अतिशय आनंद आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दादासाहेब यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. भारत – चीन युध्दाच्या वेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा.सा. कन्नमवार यांनी राज्याची सूत्रे सांभाळली. या पदावर ते 1 वर्ष 4 महिने होते. युध्दाचा तो काळ होता. अशा परिस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यासाठी दादासाहेबांनी जनतेला आवाहन केले. त्याकाळात चंद्रपूर जिल्ह्याने तसेच महाराष्ट्राने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशासाठी सोने-नाणे, आर्थिक मदत केली.

शिक्षण आणि आरोग्य हे अतिशय महत्वाचे विषय आहेत. प्रत्येक गावात आरोग्य केंद्र असावे, असा सर्वप्रथम विचार कर्मवीर दादासाहेबांनी मांडला. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी अनेकांना प्रेरीत केले. राज्याच्या प्रगतीसाठी अतिशय मोठे योगदान दादासाहेबांनी दिले आहे. विधानसभेच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामान्य माणसांचा विकास करणे, हेच आपल्या सरकारचे सुध्दा ध्येय आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे. त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भात सर्व अडचणी सोडविण्यात येतील. तसेच ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यासुध्दा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी मनोगत व्यक्त केले.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते मा.सा. कन्नमवार गौरव स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ. गजानन कोटेवार, प्रभा चिलखे, रुपेश कोकावार, देवराव कासटवार, गजानन चंदावार यांचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी घेतले माता महाकालीचे दर्शन : चंद्रपूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचे मनोभावे दर्शन घेतले व महाकाली मातेची महाआरती केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Sat Jan 11 , 2025
मुंबई :- सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबईतील महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान गोरेगाव येथे सुरु […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!