भारत – इस्रायल देशांच्या क्षमता एकत्र आल्यास उभय देशांना लाभ : अमीर ओहाना
मुंबई:- इस्रायली लोकांच्या मनात भारताबद्दल अतिशय आदराची भावना असून अनेक लोकांकरिता भारत हा भेट देण्याकरिता सर्वाधिक पसंतीचा देश आहे. भारत आणि इस्रायल आज विज्ञान तंत्रज्ञान यांसह अनेक क्षेत्रांमध्ये प्रगत आहेत. उभय देशांनी आपल्या एकत्रित क्षमतांचा वापर योग्य रीतीने केल्यास त्यांना त्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन इस्रायलच्या संसदेचे (नेसेट) अध्यक्ष अमीर ओहाना यांनी आज (दि. ४) येथे केले.
सहा दिवसांच्या भारत भेटीवर आलेल्या अमीर ओहाना यांनी आज इस्रायल संसदेच्या (नेसेट) निवडक सदस्यांसह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी इस्रायलचे संसद सदस्य मिशेल बिटन व अमित हलेवी तसेच इस्रायलचे भारतातील राजदूत नौर गिलोन, वाणिज्यदूत कोब्बी शोशानी तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
तीन महिन्यांपूर्वी संसदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर विदेश दौऱ्याची संधी मिळाली त्यावेळी आपण पहिली पसंती भारताला दिली असे सांगून आपल्या भेटीमध्ये भारत आणि इस्रायल संसदेमध्ये सहकार्य तसेच माहितीची देवाणघेवाण याबद्दल सहकार्य करार केल्याचे अमीर ओहाना यांनी सांगितले.
इस्रायलची आमडॉस ही कंपनी पुणे येथे कार्यरत असून त्या ठिकाणी १२००० लोक काम करीत आहेत ही इस्रायलच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. भारताला जलसंवर्धन क्षेत्रात इस्रायल फार मोठे सहकार्य करीत असून मुंबई येथे खाऱ्या पाण्याचे निःक्षारीकरण तसेच मराठवाडा येथे ग्रीड प्रकल्पासाठी इस्रायल सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
तेल अवीव व मुंबई दरम्यान थेट विमान सेवा लवकरच सुरु होणार असून इस्रायल बॉलिवूडच्या मदतीने चित्रपट तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. हजारो वर्षांपासून भारतात राहत असलेल्या यहुदी लोकांना भारताने नेहमी आदर सन्मानाने वागवले, त्यामुळे इस्रायली लोकांना भारतीय अतिशय आवडतात. महाराष्ट्रातून इस्रायलमध्ये आलेले भारतीय लोक आपली भाषा, पोशाक, संगीत व खाद्य संस्कृती टिकवून आहेत असे ओहाना यांनी राज्यपालांना सांगितले.
आपल्या भारत भेटीमध्ये आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले.
इस्रायल संसदेच्या अध्यक्षांचे भारतात स्वागत करताना राज्यपाल रमेश बैस यांनी इस्रायलने भारताला कौशल्य प्रशिक्षणात सहकार्य करण्याची विनंती केली. भारत आज जगात सर्वाधिक युवा देश असून इस्रायल व महाराष्ट्रातील विद्यापीठांनी परस्पर सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
भारतातील ज्यू लोक हे देशाकरिता अलंकार असून त्यांनी राज्याच्या तसेच मुंबईच्या विकासात फार मोठे योगदान दिले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. इस्रायलमध्ये राहत असलेले भारतीय लोक हे उभय देशांमध्ये मैत्रीच्या सेतूचे काम करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी इस्रायल शिष्टमंडळाच्या सदस्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.