– पोलिसांवर कुठलाही दबाव नाही
– पोलिस उपायुक्त मदने यांनी केले स्पष्ट
– दुचाकीसह कार्सला उडविल्याचे प्रकरण
नागपूर :- घटनेच्या वेळी संकेत बावनकुळे हा ऑडी कारमध्ये होता. मात्र, तो चालकाच्या शेजारी बसला होता. तो कार चालवीत नव्हता, अशी माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांना दिली. या प्रकरणाची सखोल सुरू असून, पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत, असेही मदने यांनी स्पष्ट केले.
सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ परिसरात ९ सप्टेंबरच्या रात्री एका पांढर्या रंगाच्या ऑडी कारचालकाने प्रचंड वेगाने दुचाकीसह दोन कार्सला उडविले होते. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले होते. मेयो रुग्णालयात उपचार करून सुटी देण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणाची राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चा होत आहे. त्या पृष्ठभूमीवर मदने यांनी पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.
घटनेच्या वेळी अर्जुन हावरे कार चालवीत होता, तर संकेत बावनकुळे त्याच्या शेजारी बसला तिसरा युवक रोहित हा मागच्या सीटवर बसला होता. ठाण्यात बोलावून तिघांचीही चौकशी करण्यात आली. कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, जामिनपात्र गुन्हा असल्याने त्याला जामिनावर सोडण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, फुटेज कोणी डिलीट केल्याचे आढळून आलेले नाही, असेही मदने यांनी स्पष्ट केले.
सदर उड्डाणपुलावर पकडले
जितेंद्र सोनकांबळे हे घरी जात असताना एका पांढर्या रंगाच्या कारने त्यांना धडक दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेपूर्वी कारमधील तिघेही जण एका हॉटेलमधून भोजन करून निघाले होते. त्यांनी एकूण तीन वाहनांना धडक दिली. एका कारचालकाने पाठलाग करू त्यांना सदरच्या उड्डाणपुलावर पकडले. त्यावेळी कारमध्ये संकेत नव्हता. केवळ अर्जुन आणि होता. त्या दोघांना लोकांनी मारहाण केली. त्याची चौकशी सुरू असल्याचे मदने यांनी सांगितले. वाहनाच्या गतीसंदर्भात आरटीओला पत्र दिले असल्याचेही ते म्हणाले.
संकेतची वैद्यकीय चाचणी नाही
अर्जुन हावरे, रोहित चिंतमवार या दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर संकेतचे नाव पुढे आले. त्याचीही चौकशी करण्यात आली. अर्जुन आणि रोहितची वैद्यकीय करण्यात आली. डॉक्टरकडून मिळालेल्या अहवालानुसार दोघेही मद्य प्राशन करून होते. मात्र, संकेतची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारच्या नंबर प्लेटचा गोंधळ?
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून ऑडी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जप्त केली आहे. कार जप्त करण्यापूर्वी नंबर प्लेट काढून ती कारमध्येच ठेवण्यात आली होती. त्या कारची नंबर कुणी बदलवली, असा प्रश्न समोर आला आहे. मात्र, पोलिसांनी कार जप्त केली, तेव्हा नंबर प्लेट व्यवस्थित असल्याचे मदने यांनी सांगितले.