Ø राज्यस्तरीय स्पर्धेत विदर्भाचे ‘करवत काटी’व ‘खन फॅब्रिक’ ठरले आकर्षण
Ø येत्या 8 ऑगस्टला होणार पुरस्कार प्रदान
नागपूर :- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर स्थित वस्त्रोद्योग आयुक्तालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय “वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना २०२३-२४” चा निकाल आज जाहीर करण्यात आला. एकूण पाच पारंपरिक क्षेत्रातील प्रत्येक वाणातून पहिले तीन क्रमांक काढण्यात आले. स्पर्धेत विदर्भातील करवत काटी व खन फॅब्रिक हातमागाचे वाण विशेष आकर्षण ठरले असून येत्या ८ ऑगस्ट हातमागदिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
हातमाग व वस्त्रोद्योग विणकरांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत करवत काटी व खन फॅब्रिक या खास हातमाग वाणाने परिक्षकांचे लक्ष वेधले. नक्षीकाम, अचुकता, कापडाची आकर्षकता आणि रंगसंगतीच्या निकषावरील गुणांकनाआधारे एकूण १५ वाणांची निवड करण्यात आली.
नागपूरच्या तीन विणकरांनी मारली बाजी
नागपूरच्या विणकरांनी खन फॅब्रीक वाणात बाजी मारत या श्रेणीतील तीनही क्रमांक पटकाविले. कृष्णाजी धकाते यांच्या नारळी/हाप डायमंड डिझाईन खन फॅब्रीकने पहिला क्रमांक मिळविला. तर यशवंत बारापात्रे यांच्या चौकडा ठिकरी डिझाईन खन फॅब्रीकने दुसरा आणि प्रभाकर निपाने यांच्या स्टाईप ठिकरी डिझाईन खन फॅब्रीकने तिसरा क्रमांक मिळविला.
करवत काटी वाणात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील उद्धव निखारे यांच्या कोसा साडी करवतने प्रथम क्रमांक पटकाविला, याच जिल्ह्यातील आंधळगाव येथील गंगाधर गोखले यांच्या टस्सर सिल्क करवती बॉर्डर जाला पल्लु साडीने द्वितीय तर नागपूरच्या इशीका पौनिकर यांच्या कॉटन करवत साडीने तृतीय क्रमांक पटकविला.
घोंगडी वाणात तिनही पुरस्कार महिलांना
घोंगडी वाणात सोलापूर जिल्ह्यातील तोळणूर येथील महिला विणकरांनी तीनही क्रमांक पटकाविले. यात सिद्धम्मा कलमणी, रेवंम्मा सिन्नुर आणि विजयालक्ष्मी हुलमणी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.
पैठणी साडी वाणात छत्रपती संभाजी नगर येथील गिराम तालेब कबीर यांनी तयार केलेल्या ब्रोकेड पैठणी साडीने पहिला क्रमांक पटकाविला, येवला येथील दीपक माहूलकर यांच्या मोर ब्रोकेड साडीने दुसरा तर येवल्याच्याच युवराज परदेशी यांच्या एक धोटी (सिल्क) आसावली पल्लु साडीने तिसरा क्रमांक पटकाविला. हिमरु शाल वाणात छत्रपती संभाजी नगर येथील ईब्रान अहमद कुरेशी यांनी पहिला तर येथीलच फैसल इस्तीयाक कुरेशी यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
स्पर्धेत राज्यातून ३२ प्रवेशिका
महाराष्ट्रातून एकूण ३२ प्रवेशिका या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या. त्यापैकी पैठणी साडी १२, हिमरु शाल २, करवत काटी ८, घोंगडी ७ व खन फॅब्रीक ३ अशा प्रवेशिका प्राप्त झाल्या. येवला येथून ६ प्रवेशिका, पैठण येथून ३, छत्रपती संभाजी नगर येथून ५, आंधळगाव येथून ४, नागपूर येथून ५, धुळे येथून ३ तर तोळणूर येथून ४ प्रवेशिका प्राप्त झाल्या. तर उमरेड आणि मोहाडी येथून प्रत्येकी एक प्रवेशिका प्राप्त झाली.
असे आहे पुरस्काराचे स्वरुप
एकूण पाच पारंपरिक क्षेत्रातील वाणासाठी ही स्पर्धा घेण्यात आली असून यापैकी प्रत्येक वाणासाठी सर्वोत्तम तीन वाणांची निवड करण्यात आली. यात प्रती वाण प्रथम क्रमांकासाठी 20 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार तर तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.
परीक्षक मंडळ
वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा (अध्यक्ष), वस्त्र निर्माण तज्ज्ञ गणेश वंडकर (सदस्य सचिव) यांच्यासह सदस्य सर्वश्री विणकर सेवा केंद्र नागपूरचे उपसंचालक संदीप ठुंबरीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नागपूरच्या प्राचार्य क्रिपा सावलानी यांचा परीक्षक मंडळामध्ये समावेश होता.
दरम्यान, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी स्पर्धेत सहभागी वाणांची पाहणी केली व त्याविषयी माहिती जाणून घेतली. नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळ परिसरात विक्री व प्रदर्शनासाठी पारंपरिक हातमाग व वस्त्रोद्योग स्टॉल्स लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. विदर्भातील व्याघ्र प्रकल्प, पर्यटन स्थळांवरील कार्यालय परिसरातही असे स्टॉल्स लावण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.