आज लाभार्थी परिसंवाद कार्यक्रम प्रधानमंत्री व मुख्यमंत्री साधणार संवाद

 31 मे रोजी सिमला येथे राष्ट्रीय परीसंवाद
 नवी दिल्ली येथून प्रधानमंत्री तर मुंबईतून मुख्यमंत्री संबोधित करतील
 नागपूर जिल्ह्यातील 200 लाभार्थ्यांचा ऑनलाईन सहभाग
 बचत भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर : भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या धर्तीवर शासनाने लाभार्थ्यांसोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. तीन सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सकाळी 9.00 वाजता जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9.45 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. तर सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
पहिल्या सत्रात सकाळी 9 ते 9.45 या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्रमामध्ये विविध योजनांच्या लाभार्थ्यांसोबत मान्यवरांचा संवाद होणार आहे. वरिष्ठ अधिकारी यावेळी मार्गदर्शन करतील. तसेच शासनाच्या विविध अहवाल, यशोगाथा, पुरस्कारांचे प्रकाशन सकाळी 9.45 पर्यंत केले जाणार आहे.
दुसऱ्या सत्रात सकाळी 9.45 ते 10.45 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांशी संवाद साधणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तीन लाभार्थी उद्या मुख्यमंत्री महोदयांसोबत त्यांना मिळालेल्या विविध योजनांच्या लाभाबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम 10.45 वाजता संपणार आहे.
तिसऱ्या सत्रात सकाळी 10.50 ते दुपारी 12.10 या कालावधीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे हिमाचल प्रदेशातील सिमला येथील आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य, जिल्हास्तरावर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसह 13 योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या सत्राचा समारोप प्रधानमंत्र्यांच्या संबोधनाने होणार आहे.
नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्ह्यातील विविध योजनेतील लाभार्थी या तिनही सत्रातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. लाभार्थ्यासोबतच केंद्र व राज्य सरकारचे मंत्री, खासदार, आमदार, महापौर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेतला. त्यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या लाभार्थ्यांच्या व्यवस्थेबाबत त्यांनी निर्देश दिले.
मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक राशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत योजना, आरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजनांसोबतच राज्य शासनाच्या कृषी, सिंचन, आरोग्य व वैयक्तिक लाभाच्या योजनावर उद्या संवाद साधला जाणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये विविध सोशल मीडीया व्टिटर, फेसबुक, यु–ट्युब आदी चॅनेलवर हा कार्यक्रम लॉईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार दिलाय - जयंत पाटील

Tue May 31 , 2022
मुंबई – भाजपला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!