मुंबई :- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन 2025 या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नवलेखकांनी दि. 1 ते 31 जानेवारी,2025 या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
या सहा वाङ्मय प्रकाराला मिळणार अनुदान
(1) कविता (64 ते 96 मुद्रीत केलेली पृष्ठे 80 कविता)
(2) कथा (128 ते 144 मुद्रीत केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द
(3) नाटक/एकांकिका (64 ते 96 मुद्रीत केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 28000 शब्द)
(4) कादंबरी (128 ते 144 मुद्रीत केलेली पृष्ठे जास्तीत जास्त 45000 शब्द)
(5) बालवाङ्मय (64 ते 96 मुद्रीत केलेली पृष्ठे जास्तीत जास्त 28000)
(6) वैचारिक लेख, ललितलेख, चरित्र, आत्मकथन, प्रवास वर्णन (128 ते 144 मुद्रीत केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द)
या सहा वाङ्मय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकुराला अनुदान देण्यात येईल. नमूद केलेल्या किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास सदर मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही.
या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना 2025 माहितीपत्रक व अर्ज’ या शीर्षाखाली तसेच ‘What’s new’ या अंतर्गत ‘Navlekhak Grant Scheme Rules Book and Application Form’ या शीर्षकाखाली तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. दूरध्वनी क्र. 2432 5931 यावर संपर्क साधावा.