पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांचे एकूण ४ कार्यक्रम होते. ते चारही कार्यक्रम शांततेत पार पडले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून किमान सहा सात वेळा तरी नागपुरात आले असतीलच. मात्र आतापर्यंतच्या प्रत्येक दौऱ्यात ते कधीच नागपूरच्या संघ मुख्यालयात किंवा रेशीमबागेतील संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले नव्हते. या दौऱ्यात मात्र त्यांचा रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात भेट देण्याचाही कार्यक्रम ठरला होता. ठरल्यानुसार मोदी रेशीम बागेत गेले तिथे त्यांनी हेडगेवार आणि द्वितीय सरसंघाचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली. नंतर काही काळ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहकार्यवाह दत्तात्रय होजबळे यांच्याशी चर्चाही केली. त्यांच्या या वेळच्या रेशीमबाग भेटीबाबत वेगवेगळे अर्थ लावण्यात येत असून राजकीय वर्तुळात त्याबाबत चर्चाही सुरू आहेत.
नरेंद्र मोदी हे अगदी कट्टर संघ स्वयंसेवक म्हणून ओळखले जातात. अगदी बालवयापासून ते संघाचे स्वयंसेवक आहेत. तरुण वयात त्यांनी घर संसार सोडून संघाचे ते पूर्णवेळ प्रचारक बनले. तेव्हापासून संघ देईल त्या विविध जबाबदाऱ्या ते पार पाडत राहिले.
१९४८ मध्ये संघावर लावलेली बंदी नंतर उठवल्यावर संघाने फक्त आपले कार्य मैदाना पुरते मर्यादित न ठेवता समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यविस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विविध क्षेत्रात काम सुरू झाले असून आज समाजाच्या विविध ४० क्षेत्रांमध्ये संघ कार्यरत आहे. त्यात राजकीय क्षेत्रात जुना जनसंघ म्हणजेच आजचा भारतीय जनता पक्ष कार्यरत आहे.
संघाच्या व्यवस्थेतून समाजात कार्यरत झालेल्या या विविध संघटनांमध्ये आणि संघ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय रहावा या दृष्टीने संघाचा पूर्णवेळ प्रचारक या संघटनांमध्ये महत्वपूर्ण पदावर पाठवण्याची संघाची पद्धत आहे. नरेंद्र मोदी हे माझ्या आठवणीनुसार १९९९- २००० पर्यंत गुजरातेत संघाचेच काम करत होते. मात्र २००० नंतर संघानेच त्यांना गुजरात मधील परिस्थिती लक्षात घेत भाजपमध्ये काम करण्यासाठी पाठवले होते. तिथूनच ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान बनले.
संघाचा स्वयंसेवक असलेला भाजपचा कोणताही पदाधिकारी किंवा भाजपमार्फत उच्च पदावर पोहोचलेला कार्यकर्ता नागपुरात आला की रेशीमबाग मुख्यालयात डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातोच. मला आठवते पंतप्रधान असलेले अटल बिहारी वाजपेयी ऑगस्ट २००० मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी नागपुरात आले होते. त्यावेळी आवर्जून ते रेशीमबागेत हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. तिथून ते महाल येथील संघ मुख्यालयातही गेले होते.
मात्र पंतप्रधान झाल्यावर गेल्या अकरा वर्षात किमान सहा सात वेळा तरी नागपुरात येऊन देखील मोदी रेशीम बाग किंवा महाल येथील संघ मुख्यालयात का जात नाहीत याबद्दल विविध तर्ककुतर्क लावले जात होते. मोदी का जात नाहीत या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. मात्र आजच जाण्यामागे कारणे काय यावर चर्चा सुरू झाली आहे.
आज भारतीय जनता पक्षाचे नेटवर्क जरी तगडे असले तरी त्यांच्या मागे संघाची छुपी शक्ती उभी असते हे उघडे गुपित आहे. मोदींनी संघाकडे गेल्या दहा वर्षात दुर्लक्षच केले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तर एका भाषणात संघाच्या शक्तीची आपल्याला गरज नसल्याचेही बोलून दाखवले होते. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बसला. भाजपच्या पीछेहाटीची जी प्रमुख कारणे सांगितली गेली, त्यामध्ये संघ परिवाराला विश्वासात घेतले न जाणे हे देखील एक प्रमुख कारण सांगितले जात होते. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने संघ परिवाराला विश्वासात घेतले. त्याचा सकारात्मक परिणाम लगेचच दिसून आला. हा मुद्दा लक्षात घेऊनच मोदी आता भविष्यातही संघाने भाजपला सहकार्य करावे आणि त्या बदल्यात आम्ही तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही हे सुतोवाच करण्यासाठीच आले होते का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. मोदींनी पंतप्रधान झाल्यावर संघाच्या अजेंड्यातील काही महत्त्वपूर्ण गोष्टींना निश्चितच हात घातला. मात्र संघाच्या अजेंडा वरील अजून बरेच कार्यक्रम शिल्लक आहेत. त्या दृष्टीनेही पंधरा मिनिटाच्या बोलाचालीत चर्चा झालेली असू शकते ही शक्यता नाकारता येत नाही.
*वडेट्टीवारांनी तोडले तारे*
मोदी नागपूरला येणार आणि ते संघ मुख्यालयात हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार ही बातमी कळताच काँग्रेसवाल्यांच्या पोटात पोटशुळ उठणे हे क्रमप्राप्तच होते. महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस गटाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगेचच आपले तारे तोडले. संघ ही समाज विभाजन करणारी संघटना आहे संघाने मुस्लिम विरोधात हिंदूंना संघटित केले आहे. त्या तुलनेत काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष आहे. त्यामुळे मोदींनी संघ स्थानावर कशाला जावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
वडेट्टीवार म्हणतात की संघ ही समाज विघटन करणारी संघटना आहे. तर काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष आहे. मग काँग्रेसने इतक्या वर्षाच्या सत्तेत हिंदू आणि मुस्लिम यांना समान न्याय का दिला नाही याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे. वस्तूतः देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाचे दोन तुकडे करण्यात आले होते. हिंदूंचा हिंदुस्थान म्हणजेच भारत आणि मुस्लिमांचा पाकिस्तान असे दोन भाग ठरले होते. त्यानुसार भारतातील सर्व मुसलमानांनी पाकिस्तानात जावे आणि सर्व हिंदूंनी हिंदुस्थानात यावे असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवले होते. मात्र त्यावेळी महात्मा गांधींनी मुस्लिमांनाही भारतात ठेवून घ्यावे यासाठी आग्रह धरला. त्यासाठी प्राणांतिक उपोषणही केले. नेहरुंनीही मुस्लिमांना भारतात ठेवून घेतले. इतकेच काय तर त्यांना अल्पसंख्यांक ठरवत त्यांना हिंदूंच्या तुलनेत जास्तीचे अधिकारही प्रदान केले, तसेच जास्तीच्या सवलतीही दिल्या. गेली अनेक वर्ष आधीचा जनसंघ आणि आजचा भारतीय जनता पक्ष समान नागरी कायद्याची मागणी करतो आहे. मात्र काँग्रेसने आपल्या कारकिर्दीत तो कधीच लागू होऊ दिला नाही. आजही भाजप समान नागरी कायदा लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा त्याला विरोध आहे. इतरही अनेक मुद्द्यांवर काँग्रेस मुस्लिमांचे लांगुलचालन करत हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करते आहे. याला काँग्रेसचे सर्वसमावेशक धोरण म्हणायचे का याचे उत्तर वडेट्टीवारांनी द्यायला हवे. देशात सीएए आणि एन आर सी हे कायदे आणले तेव्हा काँग्रेसच विरोध करणाऱ्या मध्ये होती. आज वक्फ बोर्ड कायद्यातही मोदी सरकार सुधारणा करते आहे. त्यालाही काँग्रेस विरोध करते आहे. काँग्रेस जर सर्वसमावेशक धोरण राबवणार असेल तर अशा सुधारणांना काँग्रेसने साथ द्यायला हवी.
*नितीन राऊतांनी आधी या प्रश्नांचे उत्तर द्यावे.*
काँग्रेसचेच नागपूरातील दुसऱे नेते डॉ. नितीन राऊत यांनीही मोदींच्या आगमनप्रसंगी आपले विचार मांडण्याचा हक्क बजावून टाकला आहे. सुमारे पंधरा दिवसापूर्वी नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादामुळे जो हिंसाचार उसळला, त्याला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जबाबदार होते असा आरोप करून मोदी आपल्या नागपूर दौऱ्यात या दोन संघटनांच्या प्रमुखांना जाब विचारणार आहेत का असा सवाल राऊत यांनी केल्याची बातमी आहे. वस्तुतः नागपूरची दंगल कशामुळे उसळली हे जरी राउताना ठाऊक नसले तरी नागपूरकरांसाठी ते उघडे गुपित आहे. त्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली, आणि औरंगजेबाची कबर हटवली जावी ही मागणी केली. त्यावेळी त्यांनी हिरव्या चादरीत गुंडाळलेला औरंगजेबाचा पुतळा जाळला. हे आंदोलन करून हे कार्यकर्ते शांतपणे घरी निघून गेले होते.
याच दरम्यान ज्या चादरीत पुतळा जाळला गेला त्या चादरीवर कुराणातील आयते लिहिले होते अशी बातमी समाज माध्यमांमधून पसरवली गेली आणि मुस्लिमांनी एकत्र येत दुपारी साडेचार च्या सुमारास या आंदोलकांविरोधात गणेश पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इथपर्यंत ही ठीक होते. मात्र रात्री साडेसातच्या सुमारास सुमारे चार-पाचशे मुस्लिमांचा जमाव चिटणीस पार्क चौकात जमला, आणि त्याने घोषणा देत दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांच्या हातात लोखंडी पाईपही होते असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या आंदोलकांनी आसपासच्या वस्तीतील घरांवर दगडफेक केली. त्यांच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड केली आणि आगी लावल्या. हे करताना त्यांनी शोधून हिंदूंचीच घरे लक्ष्य केली. त्यामुळेच हा हिंसाचार भडकला. आता या हिंसाचार भडकण्याला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कसे जबाबदार धरता येतील याचे उत्तर उच्चविद्याविभूषित डॉक्टर नितीन राऊत यांनी आधी नागपूरकरांना द्यायला हवे. मगच त्यांनी मोदींना या संघटनांच्या प्रमुखांना जाब विचारा असा सल्ला द्यायला हवा अशी चर्चा गावात सुरू आहे.
*काँग्रेसच्या काळात विदर्भाबाहेर गेलेल्या उद्योगांबाबत अतुल लोंढेंनी आधी बोलावे…*
काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदींनी महाराष्ट्रातून मोठे उद्योग गुजरातीत पळवले असा आरोप करत आपल्या नागपूर दौऱ्यात विदर्भासाठी काही मोठ्या उद्योगांची घोषणा करायला हवी होती अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र अतुल लोंढे एक विसरतात की अनेक मोठे उद्योग आधी विदर्भात येणार होते आणि काँग्रेसच्या राज्यात ते इतरत्र पळवले गेले. माझ्या आठवणीनुसार १९७२ ला मारुती मोटर्स चा कारखाना नागपुरात येऊ घातला होता. मात्र तत्कालीन राजकारणामुळे तो नागपुरात आला नाही. मग पुढे तो दिल्लीत गेला आणि त्याचे काय झाले हा इतिहास सर्वच जाणतात. काँग्रेसच्या काळात विदर्भात अनेक मोठे उद्योग सुरू केले गेले. मात्र ते उद्योजक काही काळ राहून सबसिडी लाटून गेले, आणि नंतर त्यांनी उद्योग बंद पाडले. याचे चांगले उदाहरण म्हणजे नागपूरचा महाराष्ट्र अँटिबायोटिक्स, चंद्रपूरचा महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट अशी अनेक देता येतील. हे उद्योग पुनरुज्जीवीत करण्यासाठी काँग्रेसने काय केले हे लोंढे सांगणार आहेत का?.
एकूणच मोदी नागपूरचा दौरा करणार म्हटल्यावर राजकीय कवित्वाला जोर आला होता. आता मोदी येऊन गेलेही तरी ते कवित्व सुरूच आहे, आणि अजून काही काळ तरी हे कवित्व चालणारच आहे.
– अविनाश पाठक