नागपूर : नागपूर महानगरातील प्रमुख रस्ते व स्थळांचा कायापालट पुढील काही दिवसात होणार आहे. जी-20 परिषदेच्या आयोजनाबाबत विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज आढावा बैठकीत महानगर क्षेत्रामध्ये होणाऱ्या सजावटी व पायाभूत सुविधांच्या संदर्भातील कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित संस्थांना दिल्या.
जी-२० परिषदेच्या आयोजनाबाबत आज डॉ. बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सहायक पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या संस्थांनी आज शहरातील नियोजित रस्ते व स्थळांच्या सौंदर्यीकरणाबाबत व विकासाबाबत सादरीकरण केले.
जी-20 परिषद आयोजनाच्या दृष्टीने महानगरपालिकेल्या माध्यमातून शहरातील विमानतळ ते प्राईड हॉटेल आणि पुढे रॅडिसन ब्लु हॉटेल, मिहान, पेंच, फुटाळा तलाव आदी मार्गांवर सौंदर्यीकरण व रस्ते विकासाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या मार्गावर नियोजित सौंदर्यीकरण व विकास कार्य पार पाडतांना नागपूरचे वैशिष्टये असणारी संत्री येथील विविध प्रसिद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित व्हावा अशा सूचना यावेळी डॉ बिदरी यांनी केल्या.
नागरी संस्थांच्या प्रतिनिधींना सूचना देण्याचे आवाहन
नागपूरात २१ आणि २२ मार्च २०२३ दरम्यान जी-२० परिषदेचे आयोजन होणार आहे. यात २७ देशांतील ६० प्रतिनिधींसह भारतातील जवळपास १४० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिव्हील सोसायटी अर्थात सी-२० ही या परिषदेची मध्यवर्ती कल्पना आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत नागरी संस्थांसाठी ही नामी संधी असल्याचे डॉ. बिदरी यांनी सांगितले. या संधीचा उपयोग करून स्थानिक नागरी संस्थानी वेगवेगळे जनजागृतीपर आयोजन करावे . तसेच जागतिक स्तरावर उपयुक्त ठरतील अशा सूचना व मते या संस्थानी द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या संस्थानी आपल्या सूचना व मते उपायुक्त (करमणूक) चंद्रभान पराते यांच्या कार्यालयात पोहचवावे .प्राप्त सूचना व मते जी२० सचिवालयास पाठविण्यात येतील असेही डॉ. बिदरी यांनी सांगितले.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या उदघाटनापासून ते समारोपापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत तसेच या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत यावेळी संबंधित विभागांनी सादरीकरण केले. आयोजनाच्या तयारी विषयी यावेळी सविस्तर चर्चा झाली.