नागपूर :- ऑफ्रोह संघटनेचे अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या मागणी करिता राज्यव्यापी आमरण उपोषणाचा पाचव्या दिवशी सुद्धा राज्यकर्त्यांना पाझर फुटला नाही. शासनाने आम्हाला मरण्यासाठी वाऱ्यावर सोडले असल्याचे ऑफ्रोह राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांनी म्हटले.
संविधान चौकातील उपोषण मंडपास सुनिल शिंदे माजी मंत्री यांनी भेट देऊन उपोषण कर्त्याच्या भावना जाणून घेतल्या. कायदे माणसासाठी असतात, माणूस कायद्यासाठी नसतो. त्यामुळे सरकारने माणुसकी दाखवून अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन दयावी. अधिसंख्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांच्या जिवंतपणी सोडवावे असे म्हणाले.
ऍड. शैलेश नारनवरे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप चांगला संविधान लिहिला. परंतु राज्यकर्ते संविधानाचे पालन करत नाही. त्यामुळे हलबा सह इतर अन्यायग्रस्त जमातीवर सातत्याने अन्याय होत आहे.
जगदिश बहेरा केसचा निकाल बेंचचा आहे व मिलिंद कटवारे केसचा निकाल ५ बेंचचा आहे. जगदीश बहेराचा निकाल देतांना संविधानिक गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला. अधिसंख्य कर्मचाऱ्यांनी आता आमरण उपोषण पेक्षा उग्र आंदोलन करण्याची तयारी ठेवावी. न्याय मिळविण्यासाठी तुम्ही रस्त्यावर लढा आम्ही न्यायालयात लढतो असे विचार मांडले.
आज ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष दामोधर खडगी, लिलाधर बारंगे, चंद्रकला बाजीराव, पल्लवी हेडाऊ, मीना बोकडे या उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली. त्यांना मेयो रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.