नागपूर :- जनतेला अखंडित वीज देऊन त्यांचे आयुष्य प्रकाशमय करणा-या महावितरणच्या उमरेड विभागातील 14 कर्मचा-यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत अंधकारमय आयुष्य असलेल्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या उमरेड विभागिय कार्यालयात रौशनी फाऊंडेशन, नागपूर यांचेतर्फे कार्यकारी अभियंता उमरेड विभाग आणि माधव नेत्रालय, नागपूर ह्यांचे संयुक्त विद्यमाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नेत्रदान जागरूकता आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या शिबिरात 70 कर्मचारी सहभागी झाले होते, त्यापैकी 14 कर्मचा-यांनी नेत्रदान संकल्प पत्र भरून दिले तर 67 कर्मचा-यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
या शिबिराच्या प्रास्ताविकेत रोशनी फाऊंडेशनचे राजेंद्र जैन मारणोपरांत नेत्रदानाचा उद्देश आणि कार्य याबाबत माहिती दिली. तसेच नेत्रदानाची आवश्यकता व महत्व सांगून मरणोपरांत नेत्रदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि माधव नेत्रालयचे विश्वस्त डॉ. अनिल शर्मा यांनी नेत्रदानांची सखोल माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचे आवाहन केले. तसेच डोळ्यांची संरचना आणि नेत्रदान या विषयी माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले तर कार्यकारी अभियंता चंदन तल्लावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून जास्तीतजास्त लोकांनी मरणोपरांत नेत्रदान करुन नेत्रहीन व्यक्तींचे जीवन सुकर करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यश्स्वीतेसाठी उप कार्यकारी अभियंता दिलीप राऊत, सहायक अभियंता दीपिका उईके, गरिमा ठाकूर, विक्रम उराडे सहायक अभियंता, रौशनी फाऊंडेशन नागपूर तर्फे सर्वश्री विजय मानकर, प्रभाकर दाणी, अनुपम शुक्ला, भगीरथ साहू, अशोक गजापुरे, विजय टेकाडे, सुरेश अगळे यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले. माधव नेत्रालयतर्फे वैभव इंगळे, सोनाली दुबे, कुमारी रश्मी सिंघ यांनी उपस्थितांची नेत्र तपासणी केली.. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहायक अभियंता विक्रम उराडे यांनी केले.