-तिकडे लग्नाची तयारी, इकडे पोलिसांच्या बेड्या
– मुंबईची लव्ह एक्सप्रेस नागपुरात डिरेल
नागपूर :-डोळ्यात स्वप्ने साठवून ते निघाले, आयुष्याची सुरूवात करायला. त्यांनी खुप स्वप्न रंगविले. प्रवासादरम्यान मंगलमय क्षणांच्या जगात पोहोचले. मात्र, डोळ्यात साठविलेली स्वप्ने अश्रूंबरोबर वाहून जातात याची त्यांना कल्पनाच नव्हती. सहजीवनाच्या कल्पनेत असताना अचानक पोलिसांनी त्यांना जागे करून वास्तविकता दाखविली.
ती मुंबईची तो कोलकात्याचा. कामानिमित्त तो मुंबईल आला. मनासारखे काम मिळाले आणि तो स्थायी झाला. सुटीच्या दिवशी तो फिरायला गेला. तेथे एका मुलीची भेट झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. हळू हळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. त्यांच्या प्रेमाला सात वर्ष झाली. दोघेही वयात आली. ती सुध्दा खाजगी काम करते. आता लग्न करायचे असा त्यांनी निर्णय घेतला. मात्र, लग्नासाठी तिच्या घरच्यांची परवानगी नव्हती.
त्यामुळे दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे मुंबई -हावडा गीतांजली एक्सप्रेसने दोघेही निघाले. कोलकात्याला पोहोचल्यावर दुसर्याच दिवशी लग्न करणार असा त्यांचा विचार होता. त्यानुसार मित्रांनी तयार सुध्दा केली. मात्र, गीतांजली एक्सप्रेस नागपुरात येताच लोहमार्ग पोलिस रंजना कोल्हे, आम्रपाली भगत, विणा भलावी, प्रणाली चातरकर, रोशनी डोये, नाजनीन पठाण यांनी गाडीचा ताबा घेतला. प्रत्येक डब्याची झडती घेतली. दोघेही एस-7 बर्थवर मिळाले. पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर मिळालेल्या छायाचित्रासह मिळविले असता ते त्यांची खात्री पटली. त्यांना पोलिस ठाण्यात आणले. संपूर्ण चौकशी केली असता लग्न करण्यासाठी निघाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कायदेशिर कारवाईनंतर त्यांना कुटुंबियांना माहिती दिली. आता उरल्या केवळ सात वर्षातील सहवासाच्या आठवणी.
अपहरणाचा गुन्हा
ती दिवसभर घरी आली नाही, सायंकाळनंतरही तिचा काही पत्ता नाही. घाबरलेल्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपहरणाचा गुन्हा नोंदविला. लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ नागपूर पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले तसेच दोघांचेही छायाचित्र व्हॉट्स अॅपवर पाठविले. लोहमार्ग पोलिसांनी शोध घेवून दोघांनाही ठाण्यात आणले. तिच्या कुटुंबियांना माहिती दिली. शनिवारी सायंकाळी तिचे नातेइर्वाक आले. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या उपस्थितीत तिला नातेवाईकांच्या सुपूर्द केले.