- सीताबर्डी मेट्रो जंक्शनवर शासनाचा विकास संवाद बहरला
- माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद
नागपूर: गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने कोरोनासह विविध नैसर्गिक आपत्तींचा समर्थपणे सामना करत राज्याच्या विकासाचे चक्र अव्याहतपणे सुरु ठेवले आहे. विविध आघाड्यांवर सरकारने दमदार कामगिरी केली असून विविध समाजघटकांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या विकासपर्वाचे पुरेपूर प्रतिबिंब या चित्रमय प्रदर्शनात उमटले असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले.
राज्यातील विद्यमान सरकारच्या दोन वर्षातील विकास योजनांवर आधारित ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ हे चित्र प्रदर्शन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे आयोजित करण्यात आले आहे. सीताबर्डी मेट्रो जंक्शन येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अँड. अभिजीत वंजारी, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे– चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, माहिती संचालक हेमराज बागुल, स्मार्ट सिटीचे प्रकल्प संचालक चिन्मय गोतमारे, मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाविकास आघाडी शासनाने कोविड काळातही समर्थपणे संकटांना तोंड दिले. सर्व समाजघटकांना दिलासा देण्याचा निष्ठेने प्रयत्न केला. राज्य शासनाने दोन वर्षात विकासकामांना गती दिली. त्याचे प्रतिबिंब या प्रदर्शनात दिसून येते. प्रदर्शनाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या विविध योजना, विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे. या मेट्रो स्टेशन परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतरासाठी चळवळ सुरु झाली. तसेच विविध विद्यार्थी चळवळींचा हा परिसर साक्षीदार आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक स्थळावरून जनतेमध्ये जागरुकता निर्माण होणार आहे, असे मंत्री डॉ. राऊत यावेळी म्हणाले.
शहरातील सर्व मेट्रो स्टेशनला इव्ही स्टेशन (ईलेक्ट्रीकल व्हेईकल चार्जींग)ची सुविधा उपलब्ध करण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. कस्तुरचंद पार्क येथे ‘अँडव्हॉटेज विदर्भ‘चे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये ईलेक्ट्रॉनिक दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश राहणार असून पर्यावरणस्नेही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनामधून मिळेल, अशीही माहिती डॉ. राऊत यांनी यावेळी दिली.
प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका माहिती संचालक हेमराज बागुल यांनी प्रास्ताविकामधून विशद केली. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने लोककल्याणकारी दृष्टिकोनातून सुरु केलेली विकासयात्रा लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर शहरातील मेट्रो संस्कृतीचे प्रतिक असलेल्या या जंक्शनमध्ये हे प्रदर्शन जाणिवपूर्वक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी तर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी आभार मानले. या चित्रमय प्रदर्शनाला मेट्रो प्रवाशांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राज्यस्तरावरील तसेच नागपूर विभागात जिल्हास्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या यशस्वीतेचा या प्रदर्शनात चित्रमय आढावा घेण्यात आला आहे. त्यासोबतच नागपूर मेट्रोच्या विकास कामांची माहिती या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. आजपासून सुरु झालेले हे प्रदर्शन दि. 5 मे पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क खुले राहणार आहे.