– ‘नमो महारोजगार’ मेळाव्याचे उद्घाटन
नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा निर्धार केला आहे. देशातील तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने पाऊलही टाकले आहे. आपली अर्थव्यवस्था रोजगार निर्माण करणारी असणे देशाची गरज आहे. तसे झाल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न फार दूर नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये नमो महारोजगार मेळ्याचे ना. गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष जयस्वाल, आमदार प्रसाद लाड, आमदार मोहन मते, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री परिणय फुके, माजी आमदार आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर कोहळे, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, टेक महिंद्राचे सीईओ निखिल अलुलकर, शिवानी दाणी यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.
ना. गडकरी यांनी नमो महारोजगार मेळ्याच्या आयोजनासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘५२ हजार तरुणांनी या रोजगार मेळ्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे, याचा आनंद आहे. गरिबी ही आपल्या देशाची सर्वांत मोठी समस्या आहे. कारण रोजगाराचा अभाव आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. रोजगार मिळाला तर गरिबी दूर होईल आणि सुखी समृद्ध राष्ट्र निर्माण होईल.’
१ लाख तरुणांना रोजगार
२०१४ पासून मिहानकडे आम्ही विशेष लक्ष दिले. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला ओनरशीप दिली. आतापर्यंत ६८ हजार ७६७ तरुणांना प्रत्यक्ष आणि ३२ हजार १४१ तरुणांना अप्रत्यक्ष असा एक लाख ९ हजार ८ तरुणांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. पुढील तीन वर्षांत हा आकडा दोन लाखांपर्यंत जाईल असा विश्वास आहे. टीसीएस, एमसीएल, टेक महिंद्रा, इन्फोसीस या कंपन्यांच्या माध्यमातून येत्या काही वर्षांमध्ये हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.
ग्रामीण भाग रोजगाराच्या प्रवाहात यावा
शहरी भागातील तरुणांप्रमाणे ग्रामीण भागही रोजगाराच्या प्रवाहात यावा, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शेतामध्ये युरियाच्या फवारणीसाठी द्रोणचे तंत्रज्ञान वापरणे, बांबुपासून तयार होणाऱ्या व्हाईट कोळशाची निर्मिती आदी प्रयोग महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी रोजगाराचे माध्यम ठरणार आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही उद्योजकता निर्माण करण्यासाठी, तेथील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले. तरुणांना रोजगार कसा मिळेल, यासाठी एका तज्ज्ञ समितीकडून अध्ययन करून घेत सविस्तर धोरण तयार करावे, अशी अपेक्षा ना. गडकरी यांनी राज्य सरकारकडे व्यक्त केली.
नोकरीच्या संधी निर्माण होतील – देवेंद्र फडणवीस
ना. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर आणि विदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण करण्याचे काम आम्ही करीत आहोत. नागपूर व विदर्भात जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक होत आहे. तंत्रज्ञान बदलत असताना त्याला अनुरुप मनुष्यबळ तयार करण्यासाठी महाराष्ट्रात कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्यात आले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.