‘हर घर दस्तक’ मोहिमेला आणखी गतिशील करण्याचे निर्देश
शाळांना मुलांचे डोस पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
कमी लसीकरण असणाऱ्या ठिकाणी विशेष मोहीम राबविणार
नागपूर : ‘कोरोना’ पासून बचाव करण्यासाठी एकमेव उपाय लसीकरण आहे. मुंबई व देशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहे. अशा वेळी नागरिकांनी पहिला झाला असेल तर दुसरा घ्या. दुसरा झाला असेल तर बूस्टर डोस घ्या. आपल्या घरातील मुलांचे डोस पूर्ण झाल्याची खात्री करा, कोरोनाला सहजतेने न घेता नागरिकांनी लसीकरणाकडे लक्ष वेधण्याचे, आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज केले.
लसीकरण आढावा बैठक, जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे. आजच्या बैठकांमध्ये जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्ण संख्येबद्दल आढावा घेण्यात आला. तसेच तज्ञांचे यासंदर्भातील निरीक्षणावर चर्चा करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत पहिल्या सात दिवसात 12 ते 18 वयोगटातील 777 मुलांना डोस दिला गेला आहे. तर तर याच वयोगटातील दुसरा डोस 759 मुलांना दिला गेला आहे. 18 वर्षावरील वयोगटातील 1567 युवकांना डोस देण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यात 9 हजार 424 घरांना भेटी देण्यात आल्या आहे.
यावेळी कामठी व अन्य काही तालुक्यांमध्ये प्रमुख शहरांमध्ये लसीकरणाची गती कमी असल्याचे निदर्शनास आणले गेले. अशाच ठिकाणी अधिक गतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी तसेच गावांमध्ये प्रतिष्ठित नागरिकांनी, युवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी यावेळी केले.
लक्षणे दिसली की चाचणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आढळून आल्यास कोणत्याही रुग्णाला आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये सक्तीने भरती करण्यात आलेले नाही. घरी विलगीकरणात रुग्णांना राहता येणार आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आले तरी घाबरू नये, मात्र लसीकरणापासून वंचित राहू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी झालेल्या लसीकरण विषयावरील बैठकीमध्ये कोरोना व्यतिरिक्त वर्षभरात आवश्यक असणाऱ्या लहान मुलांपासून वयस्कापर्यंतच्या अनिवार्य व आवश्यक (कोरोना व्यतिरिक्त) लसीकरणाची गती वाढवावी व नियमितपणे सर्वांना सर्व लसी उपलब्ध राहतील यासाठी लक्ष वेधण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. लसीकरण संदर्भातील वार्षिक कॅलेंडर पूर्ण करण्यात यावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीला टास्क फोर्सच्या सदस्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. साजिद, डॉ साईनाथ भोवरे, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी व वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.