– अनेक भागात रस्त्यांची स्वच्छता, औषध फवारणी
नागपूर :- नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थिती आणि नंतर झालेल्या नुकसानातून नागरिकांना सावरण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सेवेचे कार्य निरंतर सुरूच आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी जमा झाले होते.काही ठिकाणी झाडे पडली होती. मनपाच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा पथकासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय सैन्य दल आणि आपदा मित्र दल या सर्वांद्वारे या सर्व ठिकाणी युद्धस्तरावर बचावकार्य करीत शेकडो नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीतून सुखरुप बाहेर काढून विस्थापित केंद्रामध्ये पाठविण्यात आले होते. आता अनेक भागातील जमा झालेले पाणी ओसरले असून, मनपातर्फे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात मनपाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. आरोग्याच्यामुद्वारे नागरिकांना क्लोरीनच्या गोळ्या वितरित केल्या जात आहेत. तसेच ज्या ठिकाणी अद्याप पाणी साचले आहेत अशा ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. स्वच्छता विभागाद्वारे विविध भागातील रस्ते स्वच्छ केले जात आहेत. शहरातील अंबाझरी लेआउट डागा लेआउट या रोडवर साचलेला गाळ जेसीबीच्या साह्याने स्वच्छ करण्यात आला आहे. याशिवाय रा. स्व. संघ लोक कल्याण समिती, मैत्री परिवार रोटरी क्लब ईशान्य आदी सामाजिक संस्थेच्या सहकार्याने विस्थापित करण्यात आलेल्या नागरिकांना फूड पॅकेट, पिण्याचे पाणी वितरित करण्यात आले आहेत. मनपाच्या चमूद्वारे नाग नदीची स्वच्छता केली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विविध परिसरात मोबाईल आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत.नागरिकांनी देखील या कार्यात प्रशासनाचे सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात येत आहे.
डेंग्यू सदृशस्थिती करीता हेल्पलाईन क्रमांक
डेंग्यू मलेरिया प्रतिबंधक उपाय योजना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेत तर्फे हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. डेंगू आजाराची लक्षणे असल्यास नागरिकांनी 07122567021 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.