वाडी (प्र) : माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक ग्राम फेटरीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. थेट सरपंच निवडणुकीत आघाडीचे रवींद्र खांबलकर हे विजयी झाले.नऊ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस-राकाँ समर्थित फेटरी विकास आघाडी पॅनलचे पाच सदस्य निवडून आले. सरपंच पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते परंतु, मुख्य लढत काँग्रेस-राकाँ आघाडीचे उमेदवार रवींद्र खांबलकर (६५७) आणि भाजपाचे सुरेश लंगडे (५९२) यांच्यात झाली. खांबलकर हे ६५ मतांच्या अंतराने निवडून आले. भाजपा समर्थित ग्रामविकास पॅनलचे वार्ड क्र. १ मधून तीन तर वार्ड क्र. २ मधून एक असे चार उमेदवार निवडून आले. काँग्रेस-राकाँ आघाडीचे वार्ड क्र. २ मध्ये दोन तर, वार्ड क्र. ३ मधील तीनही असे एकूण पाच उमेदवार विजयी झाले. आशिष गणोरकर (३२४), ज्योती राऊत (२३८), हर्षा लंगडे (२२५), वकील डोंगरे (२०८), जितेंद्र पवार (२१५), वैशाली लंगडे (२२८), मुकेश ढोमणे (२८४), रेखा ढोणे (३५१), आणि मृणाली दोडेवार (४२५) या नऊ उमेदवारांनी बाजी मारली. गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राकाँ आघाडीच्या धनश्री ढोमणे यांनी भाजपाच्या ज्योति राऊत यांचा ११० मतांनी पराभव करून सरपंचपद खेचून आणले होते.