-सूरमनी प्रभाकर धाकडे यांना अभिवादन
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चार दिवसीय बुद्ध महोत्सवाचा बुद्घ-भीमगीतांनी समारोप झाला. याप्रसंगी सूरमनी प्रभाकर धाकडे यांनी चालिवर बसविलेले आणि संगीतबध्द केलेली गीत सादर करून धाकडे यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यात आले. छाया वानखेडे यांनी सादर केलेले तुला वंदनेची फुले वाहताना या गीताने त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.
महोत्सवाप्रसंगी सूरमनी प्रभाकर धाकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बुद्घ-भीमगीतांच्या कार्यक्रमात प्रा. अनिल खोब्रागडे, छाया वानखेडे, डॉ. अहिंसा तिरपुडे, अश्वीन खापर्डे या गायक-कलावंतांनी गीत सादर केली. येथे समानतेचा, होतास दुखीतांचा, वंदन करूया, जयभीम की गुंज गुंजाता चल आदी सुरेख गीतांनी उपासक उपासिकात प्रेरणा निर्माण झाली. वादक कलावंत श्रीकांत पिसे, मानिक उबाडे, राहुल देशमुख, संजय खरे आणि मोनू ढोके यांनी साथ संगत दिली.
दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, सदस्य विलास गजघाटे उपस्थित होते. यावेळी भिक्ख्ाु संघासह उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. संचालन जगदिश भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भदन्त धम्मसारथी, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त नागवंश, भदन्त धम्म विजय, भदन्त नागाप्रकाश, भदन्त भीमा बोधी, भिक्खूनी संघप्रिया, भदन्त भिक्खू आणि भिक्खुनी संघाने सहकार्य केले.
डॉ. आंबेडकर आणि विपश्यना यावर व्याख्यान
महोत्सवा प्रसंगी आयोजित व्याख्यान मालेत प्रसिध्द साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी डॉ. आंबेडकर आणि विपश्यना याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रबुद्ध साठे, आचार्य वानखेडे, स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनीही विविध विषयावर व्याख्यान झाले.
बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, शाखा उंटखाना येथील बुद्धिस्ट सेमिनरीच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवार 10 मे रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.