नागपूर :- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत १०० दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहिम तसेच २४ मार्च रोजीच्या जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्याने नागपूर महानगरपालिकेद्वारे स्त्रीरोग तज्ञ, वंध्यत्व व हिस्टेरोस्कोपी तज्ञ डॉ. सुषमा देशमुख लिखित ‘टीबी संवाद (क्षयरोग-समग्र चर्चा)’ या पुस्तकाचे शनिवारी (ता. २२) प्रकाशन झाले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात १०० दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेच्या अंतर्गत पुस्तकाची निर्मिती करण्यात आली.
रामदासपेठ येथील हॉटेल तुली इम्पिरियल येथे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बेस्ट फिजिशियन टीबी तज्ज्ञ डॉ. राजेश बल्लाळ होते. प्रमुख अतिथी म्हणून पुस्तकाचे सहलेखक जागतिक आरोग्य संघटना सल्लागार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम डॉ. संजय सुर्यवंशी, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शहर क्षयरोग अधिकारी व पुस्तकाच्या संपादक डॉ. शिल्पा जिचकार, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्ष एस. राजलक्ष्मी, डॉ. निमगडे, पुस्तकाच्या लेखिका डॉ. सुषमा देशमुख उपस्थित होते.
क्षयरोग दुरीकरणासाठी शासन स्तरावर अनेक प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. अशात अत्यंत सोप्या भाषेत रोचक नाट्यमय पद्धतीने लिहिलेले लिखित ‘टीबी संवाद (क्षयरोग-समग्र चर्चा)’ हे पुस्तक क्षयरोग जनजागृतीकरिता एक महत्वाचे दस्तावेज ठरेल, असा सूर मान्यवरांनी प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केला. सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. राजेश बल्लाळ यांनी क्षयरोगाच्या उत्पत्तीबाबत विवेचन केले. क्षयरोग हा महामारीमुळे आलेला आजार आहे. जगातल्या अनेक देशात या आजाराची महामारी आली पण तिथे फारसा प्रभाव राहिला नाही पण भारतात या आजाराच्या महामारीने चांगलेच पाय पसरले. देशात २७ टक्के रुग्ण क्षयरोगाचे आहे. केंद्र, राज्य शासन आणि स्थानिक स्तरावर आरोग्य यंत्रणा क्षयरोग दुरीकरणासाठी काम करत असल्यामुळे आजारावर ब-याच अंशी नियंत्रण मिळविता येत आहे, असेही ते म्हणाले.
पुस्तकाचे सहलेखक जागतिक आरोग्य संघटना सल्लागार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम डॉ. संजय सुर्यवंशी यांनी क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत पुढे करावयाच्या कार्यवाहीमध्ये ‘टीबी संवाद (क्षयरोग-समग्र चर्चा)’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेला राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम हा जगातील सर्वोत्तम कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमांतर्गत जगातील सर्वोत्तम चाचणी, तपासणी, औषधांचा समावेश आहे. या कार्यक्रमामुळे अनेक क्षयरुग्णांची नोंदणी होत आहे. हे रुग्ण उपचाराच्या कक्षेत येत आहेत, ही समाधानकारक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाला सर्वांनी मदत करण्याची गरज आहे, असेही डॉ. सुर्यवंशी म्हणाले.
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेद्वारे मनपाद्वारे शहरात सुरु असलेल्या कार्याची माहिती यावेळी दिली. शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये आरोग्य विभागाद्वारे नागरिकांची तपासणी करुन उपचार दिले जात आहेत. शहरातील जास्त जास्त क्षयरुग्णांचा शोध घेउन त्यांना योग्य उपचार मिळवून देणे हेच मनपाचे प्राधान्य आहे. शहर बसेस, होर्डिंग्स, मेट्रो स्क्रिन, विमानतळ, आकाशवाणी अशा सर्वच माध्यमांवर क्षयरोग दुरीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. या कार्यात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ‘टीबी संवाद (क्षयरोग-समग्र चर्चा)’ या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी मनपाद्वारे घेण्यात आली. समाजात क्षयरोगाच्या जनजागृतीमध्ये पुस्तक महत्वाचे ठरेल, असा विश्वासही डॉ. सेलोकर यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात शहर क्षयरोग अधिकारी व पुस्तकाच्या संपादक डॉ. शिल्पा जिचकार यांनी पुस्तकातील महत्वाच्या बाबींची माहिती दिली. पुस्तकाच्या लेखिका डॉ. सुषमा देशमुख यांनी पुस्तक निर्मितीमागील रंजकता सांगितली. क्षयरोगाचे गांभीर्य, त्याची अदृश्य लक्षणे आणि त्यामुळे होणारा धोका हे सर्व अत्यंत रोचक पद्धतीने पुस्तकात नोंदविल्याचे त्या म्हणाले. त्यांनी पुस्तक निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांचे आभारही मानले.
कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. राधा मुंजे, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतिक खान, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. संकेत नांदेलकर, डॉ. सुधीर देशमुख, डॉ. विनय माहेश्वर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सारंग गुप्ता यांच्या चमूने पथनाट्यातून क्षयरोग बाबत जनजागृती केली. योगिनी जुमनाके, ऋतुजा कुमरे, सुशांत पाटील, अनुष्का शेंडे आणि शिवम मस्के यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले व आभार संगीता चावके यांनी मानले.