मुंबई :-खाद्यतेलाच्या दरातील घसरणीचा लाभ जलदगतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवायला हवा असे प्रतिपादन केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग सचिव संजीव चोप्रा यांनी केले आहे. देशातील प्रमुख उद्योगांच्या प्रतिनिधींशी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
आयात केल्या जाणाऱ्या खाद्यतेलांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमध्ये सध्या घसरण दिसून येत आहे आणि त्यामुळे भारतातील खाद्यतेल क्षेत्रामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक बाजारांमध्ये खाद्यतेलांच्या दरात होत असेलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलांचे किरकोळ दर आणखी कमी करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी या बैठकीत भारतीय सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन संस्था (एसईएआय) आणि भारतीय व्हेजिटेबल ऑईल उत्पादक संस्था (आयव्हीपीए) यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रतिनिधींनी सांगितले की गेल्या दोन महिन्यांमध्ये विविध खाद्यतेलांच्या जागतिक बाजारातील किंमतीमध्ये प्रती टन 200 ते 250 डॉलर्सची घसरण दिसून आली आहे, मात्र किरकोळ बाजारांमध्ये त्याचा परिणाम जाणवण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल आणि लवकरच किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या किंमती कमी होतील असा अंदाज आहे.
आघाडीच्या खाद्यतेल संघटनांनी त्यांच्या सदस्य संस्थामध्ये त्वरित हा विषय चर्चेला घ्यावा आणि खाद्यतेलांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांतील घसरणीच्या अनुषंगाने, देशातील खाद्यतेलांच्या किमान किरकोळ विक्री किंमती देखील कमी होतील याची तातडीने सुनिश्चिती करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. तेल उत्पादक आणि तेल शुद्धीकरण कंपन्यांकडून वितरकांना तेल विकताना असलेले दर देखील तातडीने कमी केले जावेत, जेणेकरून ग्राहकांपर्यंत पोहोचताना तेलांच्या दरातील घसरणीचा लाभ कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये असे देखील सांगण्यात आले आहे.
तेलाच्या दरांच्या माहितीचे संकलन तसेच खाद्यतेलांचे पॅकेजिंग यांसारखे इतर विषय देखील या बैठकीमध्ये चर्चेला घेण्यात आले होते.
केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग खाद्यतेलांच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवत वेळोवेळी या दरांचा आढावा घेत असते. तसेच आहाराचा अविभाज्य भाग असणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात असणे सुनिश्चित करण्यासाठी ज्या विषयांमध्ये आवश्यक वाटेल तेथे हस्तक्षेप करून हा विभाग तातडीने पावले उचलत आहे.