– नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटना आणि मनपा प्रशासनाची संयुक्त बैठक
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतील कर्मचा-यांच्या सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम तसेच अस्थायी ऐवजदारांचे ८४ महिन्यापासूनचे थकीत वेतन हे सरसकट दोन टप्प्यात देण्यात येईल, अशी ग्वाही देत यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मुख्य लेखा व वित्त अधिका-यांना दिले.
मनपा कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन व इतरही मुद्दयांच्या संदर्भात नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज सोमवारी (13 मार्च) मनपा प्रशासकांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत विविध विषयांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. मनपा आयुक्तांच्या कक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे, ॲड. राहुल झांबरे, संघटनेचे कार्याध्यक्ष रोशन बारमासे, सचिव लोकेश मेश्राम, उपाध्यक्ष आशिष पाटील, खिलावल लांजेवार, राहुल पांडव आदी उपस्थित होते.
बैठकीत संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संघटनेचे विविध विषय आयुक्तांपुढे मांडले. अनेक वर्षापासूनच्या कर्मचा-यांच्या थकबाकीला आयुक्तांनी सकारात्मकरित्या प्रतिसाद देत ही रक्कम दोन टप्प्यात कर्मचा-यांना देण्याचे निर्देश मुख्य लेखा व वित्त अधिका-यांना दिले. याशिवाय लाड पागे समितीच्या शिफारशी मनपातील अधिसंख्य पदावर कार्यरत कर्मचा-यांना लागू करण्याची मागणी यावेळी ॲड. मेश्राम यांनी केली. लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाद्वारे परिपत्रक जारी करण्यात आले असून यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेउन शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही आश्वासन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.
यावेळी माजी नगरसेवक मनोज सांगोळे हे देखील उपस्थित होते.
राजकीय पक्षांच्या पाठीशी कामगार संघटनांनी फरफटत जाउ नये : धर्मपाल मेश्राम यांचे आवाहन
राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी 14 मार्च 2023 रोजी राज्यव्यापी सरकारी कर्मचारी संप पुकारला आहे. त्या संपामध्ये नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटना सामील होणार नसल्याचा निर्णय संघटनेद्वारे घेण्यात आला. संपाद्वारे करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांच्या पाठीशी असून कामगार संघटनांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीशी फरफटत जाउ नये, असे आवाहन नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
शहरात 20 ते 22 मार्च दरम्यान जी-20 शिखर परिषदेअंतर्गत नागरी संस्थांच्या बैठक होणार आहेत. अशात आंदोलनामुळे शहराची प्रतिमा जागतिक स्तरावर खराब होउ नये, याची काळजी घेण्याचेही आवाहन ॲड. मेश्राम यांनी केले.
संघटनेला मिळणार कार्यालय
नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेला मान्यता देउन मनपा मुख्यालय परिसरात कार्यालय देण्याच्या मागणीला सुद्धा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संघटनेला मनपा परिसरात कार्यालयाची व्यवस्था तसेच सहकारी पतसंस्थेच्या नोंदणीकरीता नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाचे आश्वासीत करताना आयुक्तांनी यासंदर्भात कार्यवाहीचे सुद्धा निर्देश मुख्य लेखा व वित्त अधिका-यांना दिले.