नागपूर :- राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बही’ योजना सुरु करण्यात आलेली आहे. योजनेसाठी पात्र महिलांना आपले अर्ज सहज करता यावेत या दृष्टीने तीन स्तरीय सुविधा व ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी दिली.
ग्रामपंचायत, नगर पंचायत/परिषद व महानगर पालिका क्षेत्रात विभाग कार्यालय येथे पात्र महिलांना अर्ज देता येतील. याच बरोबर पोर्टल, मोबाईल ॲपव्दारे, सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणे शक्य नसेल त्यांना ग्रामीण भागात महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र , आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक यांच्याकडे तसेच नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर्स मध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले.
दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामुल्य असल्याकारणाने महिलांनी कोणत्याही मध्यस्थामार्फत अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. अथवा कोणत्याही ठिकाणी अर्ज भरताना कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही असे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.