संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी नगर परिषद मध्ये मागील दीड वर्षांपासून प्रशासक राज कार्यरत असून नागरिकांच्या समस्या ऐकण्यापासून ते विकासबाबीत प्रशासक ची भूमिका मोलाची ठरत आहे.त्यातच मागील काही महिन्यात कामठी नगर परिषद हद्दीतील काही प्रभागात विकासकामे करण्याचा देखावा दाखविण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या पक्क्या व उपयोगी नाल्या तोडून त्याचा विस्तारवाढ करून पुनःश्च बांधकाम करण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे त्यातच नाल्यावरील कलव्हर्ट तोडून बांधणे सुरू आहे .
मात्र जिथे आवश्यक आहे त्या नाल्या अजूनही बांधकामापासून वंचित आहेत.याकडे कुणाचेही नियंत्रण नसल्याने सगळे आलबेल सुरू असून सद्यस्थितीत विकासकामे सुरू असल्याच्या नावाखाली अतिरिक्त मलिदा लाटण्यासाठी ‘तेरी भि चूप मेरी भि चूप’या भूमिकेतून फ़क्त ‘दिखाव नाली , बजाव टाली’असा प्रकार सुरू आहे.
कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 14 येथे मेन्टेनेन्स च्या नावाखाली नाल्यावरचे पक्के कलव्हर्ट तोडून नव्याने बांधण्यात आले त्यातच रस्त्याच्या कडेला रामाजी कडबे ते मनोहर गणवीर यांच्या घरापर्यंत चा दगडी नाल्याचा भाग कोसळल्याच्या स्थितीत असून या नाल्या काठावरील घरे पडून कधीही जीवितहानी होऊ शकते याकडे स्थानिक नगर परिषद प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष पुरवून पक्की व उपयोगात असलेली नाली तोडून बांधकाम करण्याच्या कामाला गती देत आहे.यावरून कामठी नगर परिषद तर्फे विकासकामाला किती गांभीर्याने घेतले जाते त्याचे प्रात्यक्षिक उदाहरण प्रभाग क्र 14 येथे सुरू असलेल्या कामातून दिसून येत आहे.
कामठी नगर परिषद च्या या मनमानी कारभाराकडे कुणाचेही लक्ष नसून सगळे ‘ऑल इज वेल’पद्ध्तीने सुरू आहे.वास्तविकता शेवटी कामात खर्च होणारा निधी हा शासकीय निधी असून लोकांचा हक्काचा पैसा आहे.तेव्हा हा निधी शक्य तिथेच खर्ची घालून उपयोगात आणावा अन्यथा इतरत्र निरर्थक ठिकाणी देखावा म्हणून कामे करून निधीची उचल करणे कितपत योग्य ?असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.