जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी मोहिमस्तरावर धडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, शिरूर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता अतिसंवेदनशील आणि संवेदनशील भागाची यादी तयार करावी. या भागातील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटी देऊन आवश्यक त्या सर्व सुरक्षितेतच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अशा भागात तातडीने शस्त्रास्त्रे जमा करण्याची कार्यवाही करावी. गुन्हेगारीवृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. तडीपार प्रकरणातील प्रलंबित सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.

आचार संहिता कालावधीत ठिकाणनिहाय पोलीस बंदोबस्ताबाबत पोलीस विभागाने आराखडा तयार करावा. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

आदर्श आचार संहिता कालावधीत बेकायदेशीर बँकेचे व्यवहार, दारुसाठा मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. ईव्हीएम सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे. ईव्हीएम वाहतुकीच्यावेळी एकाच पथकाची नेमणूक करावी. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार एकाच ठिकाणी पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असल्यास अशा ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात.

निवडणुकीच्या संदर्भात काम करणाऱ्या समन्वय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे.राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज अहवाल मागविण्यात यावा. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक विषयांचे सुक्ष्म नियोजन करावे. सर्व संबंधित यंत्रणेने समन्वय साधून कामे करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्रे, बेकायदेशीर बँकेचे व्यवहार, अवैध दारुसाठा, शस्त्रास्त्रे, खर्चाबाबत दर निश्चिती, पोलीस बंदोबस्त, वाहन अधिग्रहण, निवडणूक विषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण, निवडणुकीसाठी मनुष्यबळ, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आदीविषयक आढावा घेण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची विभागीय आयुक्तांकडून तपासणी

Thu Mar 7 , 2024
पुणे :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. डॉ.पुलकुंडवार यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी मतदान केंद्रावरील सुविधांबाबत चर्चा केली. मतदान केंद्रांवर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्राच्या दर्शनी भागात दिशादर्शक फलक लावावेत, त्याठिकाणी सुस्थितीतील रॅम्प, व्हील चेअर, विश्रांती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!