सोयाबीन, कापूस उत्पादकांना योग्य हमीभाव द्या !

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना मागणीचे पत्र

नागपूर : राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. योग्य हमीभाव देऊन आणि निर्यात धोरणात योग्य तो बदल करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागण्यांचे पत्र केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठविले आहे.

हमीभाव वाढवण्याची गरज

राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी येते. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला 8 हजार 700 आणि कापसाला 12 हजार 300 रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची मागणी कृषिमंत्री सत्तार यांनी पत्रात केली आहे .

पत्रात या केल्या मागण्या

या पत्रात प्रामुख्याने योग्य हमीभावासह सोयाबीन ढेपीच्या निर्याती संदर्भात धोरणात बदल करावा, निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासह सोयाबीनच्या वायदे बाजारावरील बंदी उठवावी, सोयाबीन वरील 5 टक्के जीएसटी रद्द करावा, खाद्य तेलावरील आयात शुल्क 30 टक्के करावा, कापसाचे आयात शुल्क 11 टक्के करावे, कृषी कर्जासाठी सिबिलची अट रद्द करावी या मागण्यांचाही पत्रात उल्लेख आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com