स्वत:ची काळजी घ्या, इतरांना जागरुक करा

– उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आशा सेविकांना प्रशिक्षण

नागपूर :- वाढत्या तापमानासोबतच उष्माघाताचा धोका वाढत आहे. शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा स्थितीत उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाच्या महत्वाच्या दुवा आहेत. आशांनी उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करतानाच इतरांना देखील त्याबद्दल जागरुक करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या उष्माघात प्रतिबंधक यंत्रणेचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरात उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात मनपा क्षेत्रातील सर्व आशा सेविकांना उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सोमवारी (ता.१७) इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा सेविकांना उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक उर रहमान, जीएनएम सिल्विया सोनटक्के आदी उपस्थित होते.

यावेळी आशा सेविकांना उष्माघात म्हणजे काय, त्यावर प्राथमिक उपचार काय व उष्माघात झालेल्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी करावयाचे उपाय तसेच उष्माघात होउ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.

खूप तापमान राहिल्यास त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. थेट उन्हात काम केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम जाणवतात शिवाय घरात राहूनही तापमान वाढीचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. अशा स्थितीत काळजी घेणे आवश्यक आहे. घामोळ्या येणे, पायाची नस लागणे (क्रॅम्प येणे), सुस्त वाटणे, चक्कर येउन पडणे ही साधारणत: उष्णतेमुळे दिसणारे परिणाम आहेत. पण यात सर्वांत उष्माघात हा अत्यंत धोकादायक आहे. उष्माघात झालेली व्यक्ती अचेत होउन जाते व त्याला स्वत:वर नियंत्रण करता येत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन जाते घाम देखील येत नाही. शरीर संपूर्ण कोरडे असताना शरीराचे तापमान प्रचंड वाढते. अशा स्थितीत अशा व्यक्तीला सावलीत नेऊन वारा घालणे, त्याच्या डोक्यावर कापड, टॉवेल ठेवून त्यावर पाणी टाकून शरीराचे तापमान थंड करण्याचा प्रयत्न व १०८ या रुग्णवाहिका सेवा क्रमांकावर फोन लावून माहिती देणे अशा बाबींची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी नोडल अधिकाऱ्यांनी केले.

मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक उर रहमान यांनी आशा सेविकांनी कार्यक्षेत्रात आढळणाऱ्या बेघर व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन केले. बेघरांच्या सोयीसाठी मनपाद्वारे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमध्ये मनपाद्वारे बेघरांचे निवास, भोजन, आरोग्य, प्रशिक्षण या सर्व बाबींच काळजी घेत जात असल्याचेही माहिती डॉ. अतीक उर रहमान यांनी दिली. आशा सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती कार्य करताना नागरिकांना ओआरएसचे पॉकीट व जनजागृती पत्रक देण्याचे देखील आवाहन डॉ. रहमान यांनी केले.

प्रशिक्षणादरम्यान इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एएनएम शीला सयाम, बकुळी अरमरकर, लीना तागडे, फार्मासिस्ट सोनाली सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येत आशा सेविका उपस्थित होत्या.

 अशी घ्या काळजी

नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघणे टाळावे. उन्हात जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा.

हे करणे टाळा

उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका, गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावे, उन्हात स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावी, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना केवळ अफवा

Tue Mar 18 , 2025
यवतमाळ :- महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नाही. सोशल मीडियावर याबाबत केवळ अफवा पसरविली जात आहे. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याची सावधानता बाळगावी. सद्यया सोशल मीडियावरून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा योजनेच्या नावाने काही मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामध्ये दि.1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!